Ambernath Crime News : अंबरनाथ पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी तब्बल सव्वाचार कोटी रुपयांचं ड्रग्स पकडलं आहे. याप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत न्यायालयात हजर केले होते. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने 16 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
छापा मारुन पोलिसांनी चरस जप्त केलं
अंबरनाथमध्ये चरस विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती अंबरनाथ पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापा मारुन पोलिसांनी चरस जप्त केलं. ज्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात सव्वाचार कोटी आहे. यातील मुख्य आरोपी हर्षल पटेल हा गुजरातला राहणारा असून गेल्या दीड महिन्यांपासून अंबरनाथ मध्ये वास्तव्याला होता. त्याचा दुसरा साथीदार सिराजुद्दीन अहमद याला देखील पोलिसांनी अटक केली. दरम्यान यामागे एक मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस या दोन आरोपीच्या माध्यमातून या टोळीपर्यंत पोहचण्याची शक्यता आहे.
मुंबईतील कांदिवली पोलिसांनी ई-सिगारेट विक्रीवर मोठी कारवाई
मुंबईतील कांदिवली पोलिसांनी ई-सिगारेट विक्रीवर मोठी कारवाई केली आहे. बंदी असलेल्या ई-सिगारेटची विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक देखील केली आहे. आरोपींची नावे रोहित उपाध्याय आणि सार्थक अग्रवाल आहेत. गस्तीदरम्यान काही अल्पवयीन मुलं ई-सिगारेट ओढताना आढळल्याने प्रकरण उघड झाले. मुलांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस आरोपींपर्यंत पोहोचले. आरोपींच्या घरांवर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात ई-सिगारेट आणि साहित्य जप्त करण्यात आलं आहे. एकूण 292 ई-सिगारेट, ई-लिक्विड आणि इतर साहित्य जप्त. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 1 लाख 16 हजार 780 रुपये आहे. इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंध कायदा 2019 आणि COTPA कायद्यांतर्गत कांदिवली पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.