मुंबई : अंबादास, तुम्ही 'पुन्हा येईन' अंस जोरात म्हणा आणि आहे त्याच पक्षातून पुन्हा या असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं. तोच सूर ओढून अंबादास दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोरच एक जाहीर वक्तव्य केलं. देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे मी देखील पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका असं मिश्कील वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून अंबादास दानवे यांचे हे शेवटचे अधिवेशन होतं. त्या निमित्ताने विधान परिषदेमध्ये त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांची भाषणं झाली. या सर्वांनीच अंबादास दानवे यांच्या कामगिरीचा गौरव केला.
काय म्हणाले अंबादास दानवे?
अंबादास दानवे म्हणाले की, "मी दहाव्या वर्षांपासून संघाशी संबंधित आहे. त्या वेळी ज्या ठिकाणी संघाचं काम होतं त्या ठिकाणी शिवसेना मजबूत झाली. तिरंगा फडकवायला मुरली मनोहर जोशी काश्मीरला गेले होते. त्यावेळी मी सुद्धा तिथं होतो. वयाच्या दहाव्या वर्षी मी संघाशी जोडलो. जिथं जिथं संघाचा विचार होता तिथं तिथं शिवसेना रुजली आहे."
बाळासाहेबांचे शब्द कायमचे कोरले
अंबादास दानवे म्हणाले की, "मी शिवसेनाप्रमुखांना पहिल्यांदा भेटायला गेलो होतो. त्यावेळी खैरे आणि रावते यांच्यामध्ये काहीसा वाद होता. बाळासाहेब म्हणाले की तुम्ही खैरे की रावतेंचे? मी म्हणालो की, आम्ही तुमचेच. त्यानंतर बाळासाहेब जे बोलले ते माझ्या मनावर कोरलेलं आहे. बाळासाहेब म्हणाले की, मी उद्या शिवसेना सोडून गेलो तर? त्यामुळे तुम्ही माझे, खैरे किंवा रावतेंचे राहू नका. तुम्ही शिवसेनेचे राहा. नेमका तोच विचार घेऊन आतापर्यंत मी काम केलं."
माझ्यावर अनेक केसेस झाल्या दोन तीन वेळा तडीपार नोटीस निघाल्या. एक काळ असा होता गिरीश महाजन आणि मी सतरंजीवर झोपायचो अशी आठवण अंबादास दानवे यांनी काढली.
ठाकरे-शिंदे एकाच फ्रेममध्ये
दरम्यान, अंबादास दानवे यांच्या विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या फोटोसेशनची चर्चा राज्याच्या राजकारणात जोरदार सुरू आहे. पहिल्या रांगेत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे या बसल्या होत्या. त्याचवेळी त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची एन्ट्री झाली. त्यावेळी त्यांना एकनाथ शिंदे यांच्या शेजारी बसलेल्या नीलम गोऱ्हे यांनी बसायला जागा दिली. पण उद्धव ठाकरे शिंदेंच्या बाजूला न बसता त्याच्या पलिकडे बसले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नीलम गोऱ्हे बसल्याचं चित्र महाराष्ट्राने पाहिलं.
ही बातमी वाचा: