Ambadas Danve On NCP Rebel MLA : गेल्यावर्षी शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 पेक्षा आमदारांनी बंडखोरी करत थेट भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पुढे शिंदे गटाने आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. दरम्यान या काळात शिंदे गटावर खोके सरकार अशी जोरदार टीका झाली. त्यातच आता राष्ट्रवादी पक्षात देखील बंडखोरी झाली असून, 30 पेक्षा अधिक आमदार अजित पवारांसोबत (Ajit Pawar) गेल्याची चर्चा आहे. तर यावरूनच आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी ट्वीट करत बंडखोरी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत. आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी 100 कोटींचा निधी देण्याची डील सुरु असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीवर प्रतिक्रिया देतांना दानवे यांनी ट्वीट केले आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, "राष्ट्रवादीच्या आमदारांना सरकारच्या गटात खेचण्यासाठी आमदारनिहाय 100 कोटींच्या निधी देण्याची डिल सुरू आहे. तर पन्नास यंदा आणि पन्नास पुढील वर्षी देण्याचा आश्वासन दिले जात आहे. तर अशा डिल सुरू असल्याची बातमी कानी पडली आहे. शिवाय कुठे विनवणी तर कुठे दमदाटी आहेच. पडद्यामागील कलाकार याबद्दल बोलतील का?, असेही दानवे म्हणाले आहेत.