Raj and Uddhav Thackeray : महाराष्ट्रात ठाकरे बंधूंबद्दलची (Raj and Uddhav Thackeray) चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मतभेद छोटे असल्याचे सांगितल्यानंतर बंधू उद्धव ठाकरे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र आणि मराठीच्या अस्तित्वाच्या तुलनेत त्यांच्या आणि उद्धव ठाकरे यांच्यातील लढाई खूपच लहान असल्याचे मनसे प्रमुखांनी म्हटले आहे. राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांनी 9 मार्च 2006 रोजी पक्षाची स्थापना केली होती. दरम्यान, दोन्ही बंधूनी एकमेकांना सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "जर ते एकत्र आले तर आम्हाला आनंद होईल कारण जर वेगळे झालेले लोक एकत्र आले आणि एखाद्याचा वाद संपला तर ती चांगली गोष्ट आहे, त्यात वाईट वाटण्याचे काय, पण त्यांनी ऑफर दिली आणि त्यांनी प्रतिसाद दिला याबद्दल आपण काय म्हणू शकतो?" दुसरीकडे, याच मुद्यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारणा करण्यात आली असता भलतेच चिडल्याचे दिसून आले. अत्यंत रागाने अरे जाऊदे म्हणत त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही.
केदार दिघेंच्या भूमिकेनं लक्ष वेधले
दुसरीकडे, ठाणे शिवसेना जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ठाकरे बंधूच्या घडामोडींवर ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, उद्धव साहेब व राज साहेब हे दोन्ही भाऊ आहेत. महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं झाल्यास त्याचा निर्णय हे दोन्ही बंधू घेतील.राज व उद्धव साहेबांनी महाराष्ट्र हितासाठी दोन पावले पुढे टाकलेले असताना अन्य नेत्यांनी भाजपला फायदा होईल अशी भूमिका घेऊन टीकाटिपणी करू नये. विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाकडून युतीवर संयमी प्रतिक्रिया येत असताना मनसे नेत्यांकडून जुने मुद्दे समोर आणून कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे दिसून येत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज बोलताना कोणत्याही अटीशर्ती नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी या घडामोडीवर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दुसरीकडे, महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शनिवारी (19 एप्रिल) सांगितले की, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे राजकारण वेगळे आहे. दानवे म्हणाले की, "दोघेही भाऊ आहेत, पण त्यांचे राजकारण वेगळे आहे. जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना एकत्र यायचे असेल तर त्यांना एकमेकांशी बसून चर्चा करावी लागेल. ही चर्चा टीव्हीवर नाही तर खासगीत व्हायला हवी."
राज ठाकरेंनी दिला प्रतिसाद
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी (19 एप्रिल) सांगितले की, महाराष्ट्राच्या हितासाठी जर त्यांना उद्धव ठाकरेंसोबत एकत्र यावे लागले तर ते (राज ठाकरे) त्यासाठी तयार आहेत.
2009 मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत 13 जागा जिंकल्या
2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदा 13 जागा जिंकल्या. 2014 मध्ये पक्षाची जागा 1 वर आली. 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत खाते उघडले गेले नाही. 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नाही. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 101 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते पण फक्त 1उमेदवार जिंकला.
इतर महत्वाच्या बातम्या