ST Workers :  एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसमोरील (msrtc workers) अडचणी संपण्याची चिन्हं दिसत नाही. राज्य सरकारकडून एसटीला (ST Bus) मदत करण्याची घोषणा होत असली तरी ही घोषणा कागदावर असल्याचे कर्मचारी संघटनांनी म्हटले आहे. सरकारकडून निधी येत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (PF), ग्रॅज्यूटीच्या हक्काचे 800 कोटी रुपये थकले असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.


एसटी कर्मचाऱ्यांचा हल्ली जो संप झाला होता त्या काळात कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी चार वर्षे निधी देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रि सदस्यीय समितीने सरकारच्या वतीने न्यायालयात मान्य केले होते. पण गेले अकरा महिने सरकारकडून अपुरा निधी येत असल्याने एसटी बँक, भविष्य निर्वाह निधी, व उपदान अशी मिळून कर्मचाऱ्यांची 960 कोटी रुपयांची देणी थकली असून मध्यंतरी सरकारने एसटीकडे जमा खर्चाचा तपशील  मागितला होता, तो एसटीने दिला असून अकरा महिन्याच्या कालावधीत साधारण 1600 कोटी रुपयांची तूट असल्याचे सरकारला कळविले आहे. मात्र ही तफावत रक्कम अजूनही मिळालेली नाही. मदतीची परिपत्रके काढली जात असून प्रत्यक्षात मात्र निधी दिला जात नाही.  त्यामुळे एसटीला मदत करीत असल्याचा सरकारचा दावा खोटा व दिशाभूल करणारा असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.


कोरोना व संपामुळे एसटीचे उत्पन्न कमी झाले. कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या कर्जाच्या वसुलीची एसटी को-ऑफ बँकेची अंदाजे 160 कोटी रुपये इतकी रक्कम  महामंडळाने बँकेकडे डिसेंबर 2022  पासून भरणा केलेली नाही. त्याचा फटका बँकेला बसत आहे. हीच रक्कम बँकेने  गुंतवली असती तर त्यावर अंदाजे एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये पेक्षा जास्त व्याज बँकेला मिळाले असते. पण ही रक्कम बुडाली असून त्याची झळ बँकेला सोसावी लागली आहे. 


त्याच प्रमाणे भविष्य निर्वाह निधी व उपदान या दोन्ही रक्कमांचा एसटी कर्मचाऱ्यांचा स्वतंत्र ट्रस्ट आहे. वेतनातून कपात केलेल्या पीएफ व ग्रॅज्युटीच्या रक्कमेचा हिस्सा एसटीने या ट्रस्टकडे भरणा केलेला नाही. सप्टेंबर 2022 पासून अंदाजे 800 कोटी रुपये इतकी रक्कम ट्रस्टकडे भरणा केलेली नाही. ही रक्कम ट्रस्टकडे भरणा न झाल्याने गुंतवणुकीनंतर त्यावर मिळणारे अंदाजे 40 कोटी रुपये इतके व्याज बुडाले आहे. यामुळे ट्रस्टचे परिणामी कर्मचाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या सर्व प्रकाराला सरकार जबाबदार असून सरकारच्या एसटी व कर्मचाऱ्यांसंदर्भातील घोषणा वेगवान व गतिमान दिसत आहेत. मात्र, मदत ही संथगतीने होत असल्याचे बरगे यांनी म्हटले आहे. या संथ कारभाराचा फटका एसटीच्या कामकाजावर झाला आहे. त्यामुळे महिन्याला येणारी तूट भरून काढण्यासाठी तफावतीची रक्कम सरकारने तात्काळ दिली पाहिजे अशी मागणीही श्रीरंग बरगे यांनी केली आहे.