(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अन् ती ट्रीप त्यांच्यासाठी ठरली शेवटची, तेलंगणातील बासर येथे फिरायला गेलेल्या अकोल्यातील दोन युवकांचा बुडून मृत्यू
Akola News : अकोल्यातील भौरद आणि जुने शहरासह अन्य भागातील 17 जणांचा ग्रुप तेलंगणा राज्यात फिरायला गेला होता. हे सर्व जण काल पहाटे तेलंगणा राज्यातील बासर येथे पोहचले होते.
Akola News Update : तेलंगणा राज्यातील बासर येथे फिरायला गेलेल्या अकोल्यातील दोन युवकांचा बुडून मृत्यू झाला आहे. प्रतीक महेश गावंडे (वय 22, राहणार भौरद, जि. अकोला.) आणि किरण लटकूटे (रा. भारती प्लॉट, जुनेशहर अकोला.) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या या युवकांची नावे आहेत. बासर येथील गोदावरी नदीत बुडाल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ही घटना घडली असून भायनसा येथील शासकीय रूग्णालयात दोघांच्याही मृतदेहांची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
अकोल्यातील भौरद आणि जुने शहरासह अन्य भागातील 17 जणांचा ग्रुप तेलंगणा राज्यात फिरायला गेला होता. हे सर्व जण काल पहाटे तेलंगणा राज्यातील बासर येथे पोहचले होते. यावेळी हे सर्व जण गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते. पोहत असतानाच प्रतीक आणि किरण यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीत बुडाले. सोबतच्या मित्रांनी त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे दोघांनाही आपला जीव गमावला लागला.
घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घनास्थळी दाखल झाले आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या दोघांचेही मृतदेह शोधून पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
दरम्यान, तेलांगणामधील निर्मल जिल्ह्यातील भायनसा येथील शासकीय रूग्णालयात दोघांच्याही मृतदेहांची उत्तरीय तपासणी झाली असून दोघांचेही नातेवाईक कालच भायनसाला पोहोचले होते. नातेवाईक दोन्ही युवकांचे मृतदेह घेऊन आज सकाळी अकोल्यात पोहोचले आहेत. प्रतीक आणि किरण या दोघांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. प्रतीक हा त्यांच्या आईवडिलांचा एकुलता मुलगा आहे. दोन्ही तरूणांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बाहेर फिरण्यासाठी गेल्यानंतर योग्य ती खबरदारी घेऊन मज्जा-मस्ती करावी अशा प्रतिक्रिया पालकांमधून उमटत आहेत. दरम्यान, अकोल्यात दोघांच्याही मुळ गावी आज प्रतीक आणि किरण यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती दोघांच्याही नातेवाईकांनी दिली.