Akola: दुष्काळातही शेतकऱ्यांच्या दारात फायनान्स कंपन्यांची दादागिरी? अकोल्यात कर्जवसुलीसाठी गेल्याचा पुरावा म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीचे फोटो काढले अन्...
Akola News: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरही ग्रामीण भागात पतसंस्था, छोट्या बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचे आरोप होताहेत.

Akola News: राज्यात एकीकडे दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कर्जवसुली (Loan Recovery) थांबवण्याच्या सरकारकडून घोषणा होताहेत. खुद्द मुख्यमंत्री आणि बडे मंत्री शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भाषा करताहेत. मात्र, ग्राउंड रियालिटी काही वेगळीच आहे! ग्रामीण भागात पतसंस्था, छोट्या बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांवर दबाव टाकला जात असल्याचे आरोप होताहेत. संतापजनक बाब म्हणजे, कर्जवसुलीसाठी घरी गेलेले प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या पत्नींचे फोटो काढून ते वरिष्ठांना पाठवत असल्याचे पुरावे 'एबीपी माझा'च्या हाती लागलेत. अकोला (Akola News) जिल्ह्यातील डोंगरगावात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Loan Recovery: सरकारकडून घोषणांचा सुकाळ, पण अंमलबजावणीच्या नावानं मात्र पार दुष्काळच
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावरून सरकारी, सहकारी आणि खासगी बँका, पतसंस्था तसंच मायक्रो फायनान्स कंपन्यांना इशारा दिलेला आहे. मात्र, या इशाऱ्याला दहा दिवस उलटूनही ग्रामीण भागात कर्जवसुली सुरू असल्याचं वास्तव समोर आलं आहे. सरकारकडून घोषणांचा सुकाळ होतोय. पण अंमलबजावणीच्या नावानं मात्र पार दुष्काळच असल्याचे चित्र आहे एकीकडे निसर्गानं शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केलंय, तर दुसरीकडे कर्जवसुलीच्या तगाद्यानं त्यांची चिंता वाढवलीय.
Akola Farmers: हातचं पीक गेलं, उत्पन्नाचा मार्ग बंद, कर्जाचे हप्ते भरायचे कुठून,
अशातच, ही कहाणी आहे अकोला जिल्ह्यातील डोंगरगावच्या योगेश नागापुरे या तरुण शेतकऱ्याची. वडिलोपार्जित दोन एकर आणि भाड्यानं केलेली दोन एकर, अशा चार एकरांत त्यांनी पीक उभं करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. मात्र, पावसानं दगा दिला आणि चार एकरांत पेरलेल्या स्वप्नांचा चुराडा झालाय. पेरणीसाठी योगेश यांनी पत्नीच्या नावानं 'एलटी फायनान्स' आणि 'ग्रामीण कुटा' या दोन मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेतलंय. काही पैसे भरलेही. पण आता पीक हातचं गेलं, उत्पन्नाचा मार्ग बंद झालाय. संसार चालवायचा कसा आणि कर्जाचे हप्ते भरायचे कुठून, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकलाय.
Akola Farmers: कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींचे फोटो काढून ते वरिष्ठांना पाठवले
मात्र, या संकटात शेतकरी कुटुंबाला आधार देण्याऐवजी कर्जवसुलीसाठी कंपनीचे प्रतिनिधी घरी पोहोचत असल्याचा आरोप आहे. एवढंच नाही, तर कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींचे फोटो काढून ते वरिष्ठांना पाठवले जात असल्याचे पुरावे 'एबीपी माझा'च्या हाती लागलेत. 'एलटी फायनान्स कंपनी'च्या प्रतिनिधींनी असे फोटो काढल्याची कबुली 'एबीपी माझा'शी बोलताना दिलीय. वसुलीसाठी घरी गेल्याचा पुरावा म्हणून महिलांचे फोटो काढले जात असतील, तर हा प्रकार गंभीर प्रश्न उपस्थित करणारा आहेय.
Ravikant Tupkar: राज्यातील मायक्रो फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांनी कर्जवसुली थांबवावी
दरम्यान, या प्रकारावर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनीही आक्रमक भूमिका घेतलीय. राज्यातील मायक्रो फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांनी कर्जवसुली थांबवावी, असा सज्जड इशारा त्यांनी दिलाय.
एकीकडे सरकारकडून कर्जवसुलीबाबत बँक आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिलेले तथाकथित इशारे, तर दुसरीकडे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या दारात वसुलीचा तगादा! अकोल्यातील डोंगरगावातून समोर आलेला हा प्रकार सरकारच्या घोषणांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतोय. आता सरकार काय कारवाई करणार आणि संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्या या गंभीर आरोपांवर काय स्पष्टीकरण देणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
महत्त्वाच्या बातम्या






















