अकोला : अकोल्यात चार वर्षांपूर्वी एका कबड्डी प्रशिक्षकाने आपल्याच विद्यार्थीनीचं लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यातून 'ती' विद्यार्थीनी गर्भवती राहिली होती. याप्रकरणी आरोपी कबड्डी प्रशिक्षकाला अकोला जिल्हा सत्र न्यायालयाने आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. शुद्धोधन सहदेव अंभोरे असं या आरोपी कबड्डी प्रशिक्षकाचं नाव आहे. याप्रकरणी 30 जुलै 2018 रोजी एमआयडीसी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. 


कबड्डी प्रशिक्षक शुद्धोधन अंभोरे हा अकोल्यातील  शिवणी येथे कबड्डी प्रशिक्षण वर्ग चालवायचा. त्याने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला राज्यस्तरावर निवड करण्याचं आमिष दाखवत प्रशिक्षणाच्या बहाण्याने तिचं लैंगिक शोषण केलं होतं. यासोबतच तो तिला वारंवार संघातून वगळण्याची धमकी देतही लैंगिक अत्याचार करत होता. यात गर्भधारणा झाल्यावर पीडित मुलीने पोलीस तक्रार केली होती. चार वर्षांत न्यायालयात खटला चालल्यानंतर आरोपी अंभोरेला अकोला न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे.


काय आहे प्रकरण?
शुद्धोधन अंभोरे हा अकोल्यातील शिवणी येथे महिलांसाठी कबड्डीचा प्रशिक्षण वर्ग चालवायचा. त्याच्याकडे कबड्डी शिकण्यासाठी 15 ते 20 मुली होत्या. दरम्यान, या बॅचमधील एका 17 वर्षीय मुलीवर त्याची वक्रदृष्टी होती. तो तिला राज्यस्तरीय स्पर्धेत खेळविण्याचं आमिष आणि स्वप्नं दाखवत होता. यासाठी तो तिचा अधिक वेळ विशेष सराव घेऊ लागला. याचाच फायदा घेत तो तिच्याशी लगट करायचा प्रयत्न करायचा. यातच त्याने एक दिवस तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर त्याने या पीडित मुलीला कुणाला काही न सांगण्याची आणि संघातून वगळण्याची धमकी देत तिच्यावर सातत्याने अत्याचार केले. भीतीने ती मुलगी हे सारे अत्याचार सहन करत होती. यातच पीडित मुलीला गर्भधारणा झाली. हा प्रकार मुलीच्या कुटुंबियांच्या लक्षात आल्याने 30 जुलै 2018 रोजी पीडित मुलीने एमआयडीसी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मुलीच्या तक्रारीनंतर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी शुद्धोधन अंभोरेविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. 


पीडित मुलीच्या तक्रारीनंतर दुसऱ्या विद्यार्थीनीचीही विनयभंगाची तक्रार
याप्रकरणी पीडित मुलगी तक्रारीसाठी समोर आल्यावर तिच्यासोबत कबड्डीचं प्रशिक्षण घेणारी आणखी एक मुलगी समोर आली होती. या मुलीनेही शुद्धोधनविरोधात विनयभंगाची तक्रार एमआयडीसी पोलिसांत दाखल केली होती. यावरुन त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणातही अकोला न्यायालयाने आरोपीला पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 


अकोला न्यायालयाने सुनावली आजन्म कारावासाची शिक्षा 
त्यानंतर न्यायालयात यासंदर्भात अकोला जिल्हा न्यायालयात खटला सुरु झाला. पीडित मुलीचा जबाब, साक्ष आणि इतर पुरावे, डीएनए'च्या आधारे लावण्यात आलेले आरोप सिद्ध झालेत. या आधारावर न्यायालयाने आरोपीला जन्मठेपे'ची शिक्षा सुनवाली आहे. सरकारतर्फे एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक संजय कोरचे यांनी या प्रकरणाचा तपास केला आहे. सहायक सरकारी वकील मंगला पांडे आणि किरण खोत यांनी या प्रकरणात सरकारी बाजू मांडली आहे. 


शिक्षेत या बाबींचा अंतर्भाव : 
376(2)(एन) व पॉक्सो कायदा कलम 3-4-5 मध्ये दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. आणखी एका मुलीचा विनयभंग प्रकरणी कलम 354 मध्ये 5 वर्षे कारावासाची शिक्षा. कलम 506 मध्ये 2 वर्ष कारावासाची शिक्षा दिली आहे. तसेच विविध कलमाअंतर्गत 3 लाख दहा हजार रुपयांचा दंडही दिला आहे.


शिक्षेचं स्वरुप
1) बाललैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या आरोपावरुन आजन्म कारावास. 
2) विविध कलमाअंतर्गत 3 लाख दहा हजार रुपयांचा दंड. 
3) आरोपीकडून दंड वसूल झाल्यास अर्धी रक्कम पीडितेला देण्यात येणार.
4) दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्याची शिक्षा आरोपीस भोगावी लागणार.



क्रीडा क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या घटना 
मागील चार-पाच वर्षांत क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकांकडून लैंगिक शोषणाच्या काही घटनांनी अकोल्याच्या क्रीडा क्षेत्र हादरलं आहे. यापूर्वी जिम्नॅस्टिक कोचने अल्पवयीन मुलांवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर बॅडमिंटन प्रशिक्षकानं खेळाडू मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली होती. तर काही वर्षापूर्वी एका जिम ट्रेनरने एका महिलेला पळवून नेल्याची घटना घडली होती. घडलेल्या चार घटना अकोल्याच्या क्रीडा क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या आहेत.