Rohit Pawar on Ajit Pawar : राज्यसभेच्या रिक्त असलेल्या जागेवर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, सुनेत्रा पवार मागील दरवाजाने संसदेत पोहोचल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अभिनंदन करतानाच काका अजित पवार यांना खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. 


राज्यमंत्रीपद दिलं गेल्यास अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावे लागेल


रोहित पवार म्हणाले की, मुलगा किंवा बायको सोडून जाणार नाही याची खात्री दादांना असल्याने त्यांनी घरात उमेदवारी दिली आहे. माझ्या काकी म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो, आता त्या खासदार झाल्या आहेत असे त्यांनी सांगितले. दरम्यान ते पुढे म्हणाले की, अजित पवारांनी अगोदरच सांगितले होते की आम्हाला राज्यमंत्रीपद शोभणारे नाही. त्यामुळे काकींना राज्यमंत्रीपद दिलं गेल्यास अजित पवारांना स्पष्टीकरण द्यावे लागेल, असेही रोहित पवार यांनी सांगितलं. 


त्यांच्या पक्षामध्ये काय सुरू आहे याची माहिती अजित पवारांना असल्याने त्यांनी काकींना खासदारकी दिल्याचा रोहित पवार यांनी दावा केला. त्यामुळे आईला उमेदवारी मिळाली असेल,तर अर्थातच मुलगा पार्थ खुश असेल. मी तुमच्या माध्यमातून शुभेच्छा देत असल्याचे ते म्हणाले. सुनेत्रा पवारांना मागून कोणी काही तरी सांगितलं असेल. त्यामुळे मला त्यामध्ये काही वावगं वाटत नाही. 


त्यांच्याच पक्षातील लोक आम्हाला फोन करून सांगतात


दरम्यान आमदार संपर्कात असल्याच्या वक्तव्यांवर रोहित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की अजित पवारांनी भाषण केले की मला नौटंकी म्हणतात. मात्र, त्यांच्याच पक्षातील लोक आम्हाला फोन करून त्यांचे 18 आमदार आमच्या संपर्कात आहेत, असे सांगतात. त्यांच्या पक्षातील लोक अस्वस्थ आहेत. त्यांच्यासोबत असलेले आमदार ब्रह्मदेव आला, तरी त्यांच्यासोबत राहणार नाहीत. पक्षामध्ये कोणाला घ्यायचं, कोणाला घ्यायचं नाही ते साहेब ठरवतील. आम्ही फक्त विनंती करू शकतो. परत घेताना कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय झाला नसला पाहिजे, असे रोहित पवार यांनी सांगितले.


जयंत पाटील आणि माझ्यात वाद कुठं आहे? 


दरम्यान, जयंत पाटलांशी वाद सुरु असल्याच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले. जयंत पाटील आणि माझ्यात वाद कुठं आहे?  अशी उलट विचारणा त्यांनी केली. मीडियाने वेगळा अर्थ काढला. आमच्यात वाद नाहीच, आम्हाला आमच्या जागा वाढवयच्या असल्याचे ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या