Ajit Pawar In Pune: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) उपमुख्यमंत्री झाले. पण मंत्रिमंडळाचा विस्तार अजून झाला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यात तुफान पाऊस सुरु आहे. पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांचं या पावसामुळं अतोनात नुकसान झालं आहे. त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत व्हायला हवी. मंत्रिमंडळ विस्तार झाला असता तर आपल्या क्षेत्रात सगळ्यांनी कामं सुरु केली असती, असं मत विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) यांनी व्यक्त केलं आहे. ते पुणे (Pune) जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते.



सहकाराच्या निवडणुकांना सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली. मी आत्ताच या निवडणुकीची सभा घेऊन आलो. 17 जुलैला तिथं मतदान होणार होतं, पण आता निवडणूक स्थगित केली. आपण लोकशाही माणनारे आहे. घटनेनुसार सगळीकडे कामकाज सुरु आहे. कोणावर अन्याय होऊ नये यासाठी घटना काढली आहे. मात्र आता लोकशाहीची थट्टा सुरु आहे. चेष्टा सुरु आहे, असंही ते म्हणाले.


मंत्री जर नेमले असते, तर राज्यातील 36 जिल्ह्यात काम सुरू झालं असतं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघंही मालक असल्या सारखं वागत आहेत, असं मी म्हणतो मात्र ते स्वत:ला सेवक म्हणतात. चाळीस जणांना सोबत घ्या. त्यांचाही सन्मान ठेवा. संपुर्ण निर्णय त्यांचा आहे. मात्र ज्या पद्धतीने त्यांनी उद्धव ठाकरेंना घालवलं. राष्ट्रवादीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. मला तुम्ही तीस वर्षांपासून ओळखता, मी थोडं कडक वागतो पण कोणावर अन्याय करत नाही, असंही ते म्हणाले.


जनतेतून सरपंच-नगराध्यक्ष निवडून येणार असा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रपतींना, पंतप्रधान, मुख्यमंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती इथं जनता ठरवते का? मग सरपंच - नगराध्यक्षाच्या मागे का लागलाय?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.



शिंदे गटाबरोबर असलेले बरेचजण म्हणत होते की शिवसेनेचे मंत्री पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत. आशिष जयस्वालही असं म्हणाले. पंधरा दिवसात काय चमत्कार झाला की तुम्हाला तेच मंत्री आता चांगले वाटू लागले. म्हणजे कुठं तरी पाणी मुरतंय, काय तरी गडबड झाली आहे. हे त्रिवार सत्य आहे आणि हे जनतेच्या ही लक्षात येतंय. जनता दूध खुळी नाही. मी पण हे अधिवेशनात त्यांना विचारणार आहे, असं म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला.


आगामी निवडणुकीत महाविकासआघाडी कायम राहणार


महाविकासआघाडी कायम ठेवायचा निर्णय घेतला आहे. आगामी निवडणुकीत स्थानिक पातळीवर सगळे निर्णय घ्यायचे आहेत. जिल्हा आणि तालुका पातळीवरहीआघाडी बाबत ठरवायचे आहे. पक्षाच्या ताकतीनुसार समोरचे निर्णय घेतले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.