AJit Pawar Mardi : आम्ही सरकारमध्ये अनेक वर्ष होतो, शरद पवार कृषीमंत्री (Sharad Pawar ) असताना केंद्रातदेखील सत्ता होती. सगळ्या पंचायत समित्यादेखील राष्ट्रवादीच्या ताब्यात होत्या. मात्र कधीही आम्ही सत्तेचा माज केला नाही. सत्ता असताना विरोधकांनादेखील त्रास दिला नाही. त्यामुळे सत्तेचा माज करू नका आणि  केला तर आम्ही कधी सत्तेत येऊ हे कळणार सुद्धा नाही, अशा भाषेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते साताऱ्यातील मार्डीमध्ये बोलत होते.


राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कोणाच्या दबावाला बळी पडून कारण नसताना चुकीची कामे करु नयेत. दिवस बदलतात, सगळे दिवस सारखे नसतात. त्यामुळे येत्या काळात आम्ही कधी सत्तेत येऊ हे कोणाला कळणार देखील नाही. आमच्या कार्यकर्त्याकडून चूक झाली तर कारवाई करा किंवा माझ्याकडून देखील चूक झाली तरीदेखील कारवाई करा. कारण कायदा सगळ्यांसाठी सारखा असतो. मात्र कोणतीही चूक नसताना किंवा दोष नसताना सत्तेत आहोत म्हणून कोणाला त्रास द्यायचा हा प्रकार शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही  सहन करणार नाही, असा इशाराही अजित पवार यांनी दिला आहे. 


"माण खटावचा कायापालट होणार"
माण-खटाव या मतदार संघात पवार ज्या उमेदवाराची निवड करणार तो उमेदवार निवडून गेला पाहिजे. यावेळी घडाळ्याचं चिन्ह घेऊन उमेदवार या गावात निवडून येणार आहे. राजकारणात अनेकदा कठोर भूमिका घ्यावी लागते. कडक शब्दात अनेकदा अनेकांना समजून सांगावं लागतं. काहीही झालं तरी नको दादा चिडलेत असं सांगण्यात येतं. माझं चिडणं सगळं जगजाहीरच केलं आहे. सारखंच चिडायला मी काही वेडा नाही, असंही म्हणत त्यांनी सभागृहात हशा पिकवला. 


'औद्योगिक काॅरिडाॅर माणमध्ये होणार म्हणजे होणारच'


पूर्वी एखाद्याने शब्द दिला की बदलला जात नव्हता. मात्र आता अतिशय खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे. निष्ठा नावाचा प्रकार उरला नाही. कुणी अपक्ष म्हणून निवडून येत काँग्रेससोबत जातं, नंतर भाजपची कास धरतं. ही काय पध्दत आहे? म्हसवड काॅरिडाॅरबाबत 13 जुलै 2020  ला माझ्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. तसेच सोळशीकरांचा विरोध असल्यामुळे आम्ही म्हसवडला काॅरिडाॅर होण्याबाबत आग्रही आहोत, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.  कोणी काहीही म्हणालं तरी, औद्योगिक काॅरिडाॅर माणमध्ये होणार म्हणजे होणारच हा माझा शब्द आहे, आम्ही शब्दाचे पक्के आहोत, असा विश्वास अजित पवार यांनी माणच्या जनतेला दिला.