इंदापूर: दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांनी केलेल्या टीकेचा अजित पवारांनी पुन्हा एकदा त्यांच्या शैलीत समाचार घेतला. इंदापुरात नगरपालिका प्रचारादरम्यान ते बोलत होते. 'महत्वाच्या पदावर असताना जपून बोलावं,  मी स्वतः मंत्रीपदावर असताना त्याचा अनुभव घेतला आहे.' असं अजित  पवार म्हणाले.


भगवानगडावर झालेल्या भाषणात जानकरांनी अजित पवारांबद्दल अपशब्द वापरले होते. त्यावरुन त्यांच्यावर मोठी टीकाही झाली.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच जानकर बारामती नगरपालिका उमदेवारांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी भगवानगडावरील वादग्रस्त विधानाबाबत माफी मागितली होती.

'मंत्री असल्यानंतर असा शब्द गेला नाही पाहिजे. पण भावनेच्या भरात ते गेले. याची मी दिलगिरी व्यक्त करतो. बारामतीच्या जनतेबद्दल मला नेहमीच प्रेम आहे. त्यामुळे बारामतीचा खासदार मीच होणार.' असं जानकर म्हणाले होते.