महाराष्ट्रातील 72 आजी-माजी अधिकाऱ्यांसह राजकारणी सुद्धा आणि हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. विधानसभा अधिवेशनामध्येही हनी ट्रॅपवरून बरीच चर्चा झाली. मात्र सरकारकडून दावा सातत्याने फेटाळण्यात येत आहे. दुसरीकडे या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा चार मंत्री ट्रॅपमध्ये अडकले असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हनी ट्रॅपचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये चांगलाच चर्चिला जात आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी सुद्धा पेन ड्राईव्ह असल्याचे सांगत सरकारची झोप उडवून दिली होती. आता या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर आव्हान दिलं आहे.  

पेन ड्राईव्ह असेल, तर बाहेर काढा

अजित पवार म्हणाले, एकदाच सांगतो दम द्यायचा बंद करा, तुमच्याकडे व्हिडिओ असेल पेन ड्राईव्ह असेल, तर बाहेर काढा आणि ते लोकांसमोर येऊ द्या, अशा शब्दात त्यांनी विरोधकांना आव्हान दिले. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच तापला आहे.  या प्रकरणाची मुळं नाशिकपासून मुंबईपर्यंत असल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे भाजप नेता प्रफुल लोढाला मुंबईमध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध हनी ट्रॅप आणि पाॅक्सो अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संजय राऊत यांनी सुद्धा लोढावरून आरोप केले होते आणि त्या संदर्भात बोलताना अधिकची माहिती हवी असल्यास एकनाथ खडसे यांच्या संपर्क करा, असे सुद्धा म्हटले होते. 

मला यादी द्या, कुणाची बिले दिले नाहीत 

हर्षल पाटीलच्या आत्महत्येवर अजित पवार यांनी भाष्य करताना सांगितले की, मला यादी द्या कुणाची बिले दिले नाहीत. बिले देण्याची प्रक्रिया आहे. आज सकाळी आमची एक बैठक झाली आहे. एका कंत्राटदाराने सब कंत्राटदाराला नेमले होते. त्याने त्याला पैसे दिले नाहीत. मी कंत्राटदारांची माहिती घेत आहे. तरीपण एखाद्या व्यक्तीचा जीव गेला आहे. त्यामुळे सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाईल.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ

माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावर बोलताना ते म्हणाले की, मला कृषिमंत्र्यांशी समोरासमोर बोलायचं आहे. सोमवारी ते बोलतील. ते भिकारी म्हणाले याबाबत देखील मी त्यांच्याशी बोलणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आम्ही एकत्रित निर्णय घेऊ. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार आल्यानंतर भान ठेऊन वागा, अशा सक्त सूचना दिल्या होत्या. मागे देखील असंच वक्तव्य घडलं. दुसऱ्यांदा देखील घडलं आहे. त्यामुळे समोरासमोर चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.