Ajit Pawar : काहीजण म्हणतात, अजितदादा निधी देत नाहीत, समाजकल्याणचा निधी वळवला, पण मी काय पैसे खिशातून देतो का? शिंदेंच्या आमदारांचे नाव न घेता अजित पवारांचा टोला
NCP Vardhapan Din Programme : ज्याच्यात कर्तृत्व असेल, धमक असेल, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा विचार असेल त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संधी देणार असं अजित पवार म्हणाले.

पुणे : काही जण म्हणतात की अजितदादा पैसे देत नाहीत, निधी देत नाहीत. अरे पण मी माझ्या खिशातले पैसे देतो का? एकदा अर्थसंकल्प मांडला की त्यासाठी टप्प्याटप्प्याने पैसे दिले जातात. निधी काही एकदम दिला जात नाही असं स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं. समाजकल्याण विभागाचा निधी वळवल्याचा आरोप केला जातो, पण गेल्या वर्षीच्या तुलनेत त्या विभागाला 38 टक्के जास्त निधी दिला असंही अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचा 26 वा वर्धापनदिन साजरा झाला. त्यानिमित्ताने अजित पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, "काहीजण सतत बदनामी करत आहेत. सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला. 7 लाख कोटी रुपये अर्थसंकल्प जाहीर करताना 41 टक्के निधी आदिवासी समाजाला दिला. पण खोटी माहिती देऊन आरोप केले जातात. यामुळे कार्यकर्ता चलबिचल होतो. मागील वर्षाच्या तुलनेत 38 टक्के जास्त निधी यंदा दिला आहे. मुख्यमंत्री देखील याबाबत बोलले. मात्र त्याला पाहिजे तशी प्रसिद्धी मिळाली नाही."
विचारांशी कधीही तडजोड केली जाणार नाही. ज्या दिवशी विचारांशी तडजोड होईल त्यावेळी पक्षाचा पाया कमकुवत होईल. ही लढाई विचारांची आहे आणि विचारांनीच लढली जाईल असं अजित पवार म्हणाले. भुजबळ आणि दत्ताभाऊ भरणेंचा परदेश दौरा ठरलेला होता. दिलीप वळसे पाटलांची तब्येत ठिक नाही. त्यामुळे हे तीनही नेते वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत अशी माहिती अजित पवारांनी दिली.
काय म्हणाले अजित पवार?
यंदाचा 7.20 लाख कोटींचे बजेट मांडण्यात आलं. त्यामध्ये 41 टक्के निधी हा अनुसूचित विभागाला देण्यात आला आहे. गेल्या वर्षी दिलेल्या निधीपेक्षा 38 टक्के निधी जास्त दिला आहे. पण कुणीतरी म्हणतंय की अजितदादांनी निधी दिला नाही. पण ते जाणिवपूर्वक बदनामी करतात.
लोकसभेला मागच्या वर्षी केवळ 4 जागा मिळाल्या. एकत्र काँग्रेस असताना मला 1991 साली खासदारकीच तिकीट मिळालं. लोकसभेला आपला पराभव झाला त्यावेळी लोकांची नाराजी दूर करणं हे काम होतं. त्यावेळी लाडक्या बहिणीचा विचार समोर आला. सगळे सोंग करता येतं परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. त्यामुळे 40 ते 45 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय झाला.
कधी कधी बातम्या येतात अजित पवार पैसे सोडत नाही. मी काय माझ्या खिशातील पैसे देतो का? मागच्या आठवड्यात अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यात आला. आजच्या बैठकीत हा दर्जा देण्यात आला.
सीमा भागातील मराठी माणसांना सांगू इच्छतो की शिव शाहू फुले आंबेडकर विचारधारा पुढे घेऊन जाणारा हा पक्ष आहे. भाजप सोबत गेला म्हणून टीका करतात. परंतु आधी पण निर्णय घेतला होता. लोकांना दिशा देणारे विकास करणारे आणि बेरजेचे राजकारण करणारे आपण लोक आहोत. चंद्राबाबू नायडू देखील एनडीएमधे आले, आपण देखील निर्णय घेतला. पक्षाची स्थापना झाल्यापासून कायम महिलांना मान सन्मान देण्याच काम केलं आहे. लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून सत्तेत गेलो आहोत.
यावेळी केंद्र सरकार जातनिहाय जनगणना करणार आहे. यामुळे कोणता समाज किती आहे हे कळणार आहे. आदिवासी समाज मागासवर्गीय समाज किती आहे हे कळणार आहे.





















