सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मराठा आहेत. दसरा मेळाव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाला हात लावून समस्त लाखो मराठा जणांच्या समोर मराठा आरक्षण देण्याची शपथ घेतली होती. ती शपथ मुख्यमंत्र्यांनी खरी करून दाखवली त्याचा सार्थ अभिमान असल्याच्या प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. औंध येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी अजित पवार बोलत होते. महायुतीचे सरकार अशाच पद्धतीचे धडाडीचे निर्णय घेत आहेत आगामी काळात देखील असेच निर्णय घेत राहील असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला. 


जरांगेंच्या विजयी गुलालात राष्ट्रवादीची दांडी


दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी अध्यादेश मान्य केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याची करण्याची घोषणा केली. मध्यरात्री झालेल्या बोलणीमध्ये महायुतीमधील मंगलप्रभात लोढा आणि शिंदे गटाच्या दीपक केसरकर यांचा समावेश होता. मात्र, अजित पवार गटातील कोणीच नसल्याने भूवया उंचावल्या. 


इतकंचे नव्हे, तर आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे मंत्री गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, शिंदे गटाचे दीपक केसरकर, प्रवक्ते संजय शिरसाठ आदी नेते उपस्थित होते. मात्र, अजित पवारांची दांडी ठळकपणे दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांची बाजू भक्कमपणे मांडल्यानंतर त्याला कडाडून विरोध पहिल्यांदा अजित पवार गटातील छगन भुजबळ यांनी केला होता. मनोज जरांगे ज्या ठिकाणी सभा घेतील, त्याठिकाणी सभा भुजबळांकडून घेण्यात आल्याने राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष उभा राहिला.


अध्यादेशाला सुद्धा भुजबळांचा विरोध 


दुसरीकडे, सरकारमध्येच मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांनी आपल्या सरकारनेच काढलेल्या अध्यादेशाला थेट विरोध करत हा अध्यादेश नव्हे फक्त मसुदा असल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे मराठ्यांचा विजय झाला असं म्हणता येणार नाही. 16 तारखेपर्यंत आक्षेप नोंदवायचे आहेत ते आम्ही घेऊ आणि समता परिषद माध्यमातून हरकती घेऊ असे त्यांनी म्हटलं आहे. इतकच नव्हे तर मराठा समाजाला आनंद झाल्याचा वाटत असेल मात्र ते 17 टक्क्यांमध्ये असल्याचं ते म्हणाले. ओबीसीला धक्का लागणार नाही असे म्हणतात आणि बॅकडोअर एन्ट्री करतात, जात ही जन्मान येते, प्रतिज्ञापत्राने येत नाही. पोलिसांवर हल्ले झाले, डोकी फुटली, त्यांचे गुन्हे मागे कसे घेतले? अशी विचारणा त्यांनी केली.   


इतर महत्वाच्या बातम्या