Ajit Pawar Plane Crash Rohit Pawar Serious Allegation: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ सादरीकरण करत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. चौकशीला वेळ का लागत आहे अशी विचारणा करतानाच त्यांनी व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचे काम सुरु असल्याचा गंभीर आरोप केला. व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला अनेक टीडीपीचे नेते उपस्थित होते, असा दावा रोहित पवार यांनी केला. अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानाचे बेकायदेशीर नोंदणी झाली असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. मी अजितदादांच्या विमान अपघातग्रस्त चौकशीसाठी मागणी करत भाजप मला का ट्रोल करत आहे? अशी विचारणा त्यांनी केली. ब्लॅक बॉक्स जळाल्यामुळे माहिती मिळाली नाही, या दाव्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "तज्ज्ञांनी सांगितले आहे की, 1100 डिग्री सेल्सिअस तापमानात एक तास जर ब्लॅक बॉक्स आगीत राहिला तरच तो निकामी होतो, त्यामुळे या माहितीवर विश्वास नसल्याचे ते म्हणाले. रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणात डीजीसीए (DGCA) आणि व्हीएसआर (VSR) कंपनीच्या संबंधांवरही बोट ठेवलं आहे. तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना इशारा देताना ते म्हणाले की, कृपा करून कागद रंगवारंगवी करणे सोडून द्या. जर उद्या सरकारी कागदपत्रांमध्ये आणि त्यांच्याकडे असलेल्या व्हिडिओ पुराव्यांमध्ये तफावत आढळली, तर ते योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
विमानाचे बेकायदेशीर रजिस्ट्रेशन
त्यांनी सांगितले की, लेरजेट हे विमान भारतामध्ये रजिस्टरच होऊ शकत नाही. मात्र, अवैधरित्या डीजीसीएच्या काही अधिकाऱ्यांचा उपयोग करून नोंदणी झाली आहेत. स्वस्तातील विमान मुद्दाम व्हीआयपी लोकांसाठी वापरल्याचा आरोप त्यांनी केला. हे विमान अमेरिकेहून आणले असून त्याचे 5 मालक झाले होते. त्यांच्या मते, एवढं जुन मशीन याची किंमत 15 कोटीच्या पुढे नाही. अपघातानंतर विमानावर 'N80PQ' हा युएस रजिस्ट्रेशन नंबर दिसू लागला, जो आधी दिसत नव्हता, असा दावा त्यांनी केला. विमानाला रंग देण्यासाठी ३-४ कोटी खर्च येतो आणि ते अधिकृत कंपनीकडे पाठवावे लागते, पण या प्रकरणात या महाशयांनी घरीच पेंटिंग केलं असा आरोप त्यांनी केला.
ब्लॅक बॉक्स आणि सीव्हीआर (CVR) मधील तफावत
नियमानुसार सीव्हीआरमध्ये 2 तासांचा आवाज रेकॉर्ड होणे आवश्यक असताना, या विमानात फक्त 30 मिनिट रेकॉर्ड होऊ शकत होते. तसेच, भारतात 90 कोटींची हाय-टेक लॅब असताना ब्लॅक बॉक्स तपासासाठी कॅनडाला का पाठवला, असा सवाल त्यांनी केला. अपघात झाल्यानंतर चौकशीची ऑर्डर काढायला 4 दिवस का लागले, असा प्रश्न त्यांनी विचारला. तसेच, डीजीसीएच्या वेबसाईटवरून अकाउंटेबल मॅनेजरचे नाव का हटवले, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
विमान परत जाण्यापेक्षा डायरेक्ट खाली आदळण्यात आलं
रोहित पवार म्हणाले की, नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते आणि फ्यूल टँक कुठं असतं की जिथं टॉयलेट असतं म्हणजे जो विमानाचा शेवटचा भाग असतो तिथं ते ठेवण्याची जागा असते. मुंबईवरून हे विमान जात असताना फुल भरले होते. एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? असा सवाल त्यांनी केला. मुद्दामूनच कदाचित त्याचा आणि पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल. हे विमान खाली आदळण्यात आलं हे मुद्दामून आदळण्यात आलं अस आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागलं असल्याचे ते म्हणाले. दादांचं विमान जे पडलं होतं तसं कडक सरफेसवर म्हणजे ते रनवेवर पडलं नव्हतं ते साईडला पडलं होतं. इम्पॅक्ट कमी व्हायला पाहिजे होतं पण स्फोट का झाला? त्याचं मुख्य कारण.विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते, असे रोहित पवार म्हणाले. विमान परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता वाटायला लागलय, असे त्यांनी म्हटले आहे.
विमान परत मुंबईला नेणे आवश्यक होते
विझिबिलिटीच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, 3000 ची विजिबिलिटी जी 5000 पेक्षा कमी आहे (5000 हे डीजीसीएचे नॉर्म आहे), अशा परिस्थितीत एक तर तुम्ही उडायलाच नव्हतं पाहिजे आणि उडला तरी तिथे लँड करण्याचा प्रयत्न करायला नको होता. पर्यायी विमानतळ म्हणून पुणे किंवा सोलापूरची निवड करण्यात तांत्रिक अडचणी होत्या आणि चिपी विमानतळावर धुक्याची शक्यता होती, त्यामुळे विमान परत मुंबईला नेणे आवश्यक होते.
कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याचा आरोप
फ्लाईट प्लॅनबाबत रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबईत बसलेला गोपी नावाचा हँडलर फ्लाईट प्लॅन मॅनिपुलेट करू शकतो. सध्या कागदपत्रे मुद्दामून बनवण्याचे काम सुरू आहे. रोहित पवार यांनी निव्वळ कागदी पुराव्यांवर विश्वास न ठेवता डिजिटल पुराव्यांची मागणी केली आहे. आम्हाला कागदी डॉक्युमेंट न घेता सीसीटीव्हीच्या खाली केलेले त्या तारखेचे सीसीटीव्ही किंवा ईमेलचे प्रूफ पाहिजेत. फक्त कागदाला कागद जोडण्याचा प्रयत्न करू नका, डिजिटल प्रूफ आम्हाला पाहिजे ही महाराष्ट्रातल्या लोकांची मागणी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्लॅक बॉक्स आणि तांत्रिक तपास
रोहित पवार यांनी इतर विमान अपघातांची (उदा. एमिरेट्स, एअर इंडिया, बँकॉक) उदाहरणे देत सांगितले की, समान तीव्रता, आग आणि तापमान असतानाही तिथे ब्लॅक बॉक्स पूर्णपणे मिळालेला आहे. भारतात 90 कोटी रुपये खर्चून उभारलेली हाय-टेक लॅब असताना माहिती काढण्यासाठी परदेशी (कॅनडा) कंपन्यांची मदत घेण्याच्या गरजेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांना संशय आहे की विमानामध्ये केबल्सच्या पुढे दोन कॅन ठेवले असावेत, ज्याचा शोध घेणे गरजेचे आहे.
विमानाची किंमत आणि इन्शुरन्सचा संशयास्पद आकडा
विमानाची सध्याची वास्तविक किंमत 10 ते 15 कोटी रुपये असताना, त्याची इन्शुरन्स व्हॅल्यू 55 कोटी रुपये कशी होती, असा सवाल त्यांनी केला. तसेच, या विमानाची लायबिलिटी इन्शुरन्स व्हॅल्यू 210 कोटी रुपये होती. 210 कोटींपैकी पायलटला किती रुपये मिळणार होते आणि ही गोष्ट त्या पायलटला माहीत होती का? याची स्पष्टता होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डीजीसीए (DGCA) च्या वेबसाईटवरून अकाउंटेबल मॅनेजरचे नाव का हटवण्यात आले, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. त्यांच्या मते, अकाउंटेबल मॅनेजर हा रिस्पॉन्सिबल असतो आणि या प्रकरणात अशा अधिकाऱ्यांचा इंटरव्यू किंवा तपास झाला आहे का, याची माहिती घेणे आवश्यक आहे.
पायलटच्या लायसन्सवर गंभीर आक्षेप
रोहित पवार यांनी पायलटच्या लायसन्सवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. त्यांनी उदाहरण दिले की, जर तुम्ही ट्रक चालवत असाल तर तुम्हाला जेसीबी किंवा पोकलेन चालवण्याची परवानगी नसते. त्याचप्रमाणे, लेर जेट (Learjet) चालवणाऱ्या पायलटला लेगेसी (Legacy) सारखे विमान चालवता येत नाही. त्यांनी असा आरोप केला की, कपूर आणि रोहित सिंग हे दोघेही अवैध पद्धतीने ही दोन्ही विमाने चालवत होते आणि याचे डॉक्युमेंटेशन उपलब्ध असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
