Ajit Pawar Plane Crash: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातानंतर आता संशयाचं धुकं जमा होऊ लागलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशीची मागणी केली आहे. आज शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांच्यासह रुपाली ठोंबरे यांनीही चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाताचं गुढ वाढत चाललं आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

संजय राऊत काय म्हणाले? 

संजय राऊत यांनी या घटनेला रहस्यमय म्हटले आहे. ते म्हणतात, "अजित दादांच्या अपघाता संदर्भात घातपात आहे का असे प्रश्न अनेक उपस्थित केले. हे प्रकरण साधं नाहीय... हे रहस्यमय आहे." या प्रकरणाची तुलना त्यांनी जस्टिस लोहिया प्रकरणाशी केली. "मला जस्टीस लोहियाची आठवण येते या प्रकरणानंतर मला जस्टीस लोह्याची आठवण झाली." ते म्हणाले की, अजित पवारांकडे भाजपच्या भ्रष्टाचाराचे पुरावे होते. "ज्या दिवशी अजित पवारांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाच्या घोटाळ्याची फाईल माझ्याकडे आहे आणि योग्य वेळी उघड करेन तेव्हाच माझ्या मनात शंका आली." त्यांनी पुढे नमूद केले की, "त्यांनी 15 जानेवारीला हे सांगितलं आणि पुढल्या 10 दिवसांमध्ये त्यांच्या विमानाचा अपघात होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे.", भाजपच्या लोकांनी त्यांना सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरून धमकावल्यानंतर दादांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते, असते ते म्हणाले. 

मग ती सहावी व्यक्ती कोण?

अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे समर्थन करत राऊत म्हणाले, "सहा पॅसेंजर होते आणि पाचच मृतदेह मिळतायत मग ती सहावी व्यक्ती कोण?" त्यांनी पुढे एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. "सगळे देह जळून खाक झाले... अशा वेळेला दादांच्या जवळच्या फाईलचे कागद जळालेले नाहीत. ते तसेच आहेत. दादांबरोबर ती भाजपच्या भ्रष्टाचाराची फाईल होती का?", अजित पवारांचा स्वगृही परतण्याचा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का असता. "अजित पवारांनी स्वगृही जाणे हा भारतीय जनता पक्षाचा पराभव आणि देशातल्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय ठरला असता आणि भारतीय जनता पक्षाची जी दहशत आहे ती मोडून गेली असती."

"दाल मे कुछ काला है"

दरम्यान, अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूच्या प्रकरणावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शंका व्यक्त केली. विजय वडेट्टीवार यांनी या संपूर्ण प्रकरणावर संशय व्यक्त करताना म्हटले आहे की, "दाल मे कुछ काला है". त्यांनी सुद्धा अमोल मिटकरी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना आणि सवालांना पूर्णपणे दुजोरा दिला. विमानाचा पायलट शेवटच्या क्षणी बदलण्यात आल्याबद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणतात, "वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे". त्यांनी माहिती दिली की, "ज्या पायलटचे नाव पुढे आले होते तो आता जिवंत आहे कारण तो वेळेवर पोहोचू शकला नाही किंवा त्याच्या ऐवजी दुसरा कपूर नावाच्या पायलटला तिथे पाठवलं". या प्रकरणातील गूढ उकलण्यासाठी त्यांनी चौकशीची मागणी केली आहे.  

अमोल मिटकरी काय म्हणाले? 

मला निश्चित विश्वास आहे की हा धोकं नव्हतं हा धोका होता आणि अजित दादांचा हा 100 टक्के घात झालेला आहे त्याकरता मी हा लढा जिवंत आहे तोपर्यंत देणार आहे. दादांनंतर त्यांचा जो परिवार आहे त्यांच्या निष्ठेपायी मी माझं वैयक्तिक आयुष्य समर्पित करण्याचा निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले. 

उज्वल निकम काय म्हणाले?

दरम्यान, अजित पवारांच्या अपघातावर होत असलेल्या आरोपांवर भाजप खासदार  उज्वल निकम यांनी सांगितले की,  आजपर्यंत असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. ज्यामध्ये अजित दादांच्या विमानाचा जो अपघात झाला त्या विमानात सहा प्रवासी होते. एखाद्याच्या निधनाला वेगळी कलाटणी दिली जाते. वेगवेगळे संशय निर्माण करून आपण निष्कारण वेगळी कलाटणी देतो आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. त्या विमानात इंधन एवढं होतं की त्यामुळे सगळ्या डेड बॉडीज ह्या कोळशासारख्या जळून खाक झाल्या होत्या. जर कोणाचं म्हणणं असेल की यात कट होता तर कायद्यानुसार कट सिद्ध होण्यासाठी देखील प्राथमिक पुरावा लागत असतो असा सकृद्ध दर्शनी प्राथमिक पुरावा आजपर्यंत आलेला नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या