Ajit Pawar :  कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी कृषी क्षेत्राबाबत केलेल्या वक्तव्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीत असं वक्तव्य होता कामा नये. शेवटी तो आपला बळीराजा आहे, काही गोष्टी बोलून कशाला दाखवायचा? मनात ठेवायच्या असे म्हणत अजित पवारांना कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कान टोचले. माणिकराव कोकाटे यांना अजून सवय नाही मनात ठेवायची त्याच्यामुळं असं होत आहे. पण ते मला जास्त महागात पडते असेही अजित पवार म्हणाले. 

कृषी खात्याने खूप चांगलं काम केलं आहे. नुकसानीचे पंचनामे केलेले आहेत. जसे जसे प्रस्ताव येतील त्यानंतर पुढची कार्यवाही केली जाईल असेही अजित पवार म्हणाले. अचानक पाऊस आल्यामुळं या समस्या निर्माण झाल्या आहेत. कांदा उत्पादकांचे नुकसान झाले आहे. बजेटमध्ये तरतूद आहे मदत केली जाईल असेही अजित पवार म्हणाले. 

आता दिलेले पैसे तर परत घेता येणार नाहीत

लाडकी बहीण योजनेचा लाभ सरकारी कर्मचारीही घेत असल्याचे आढळून आले आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की,  ज्यावेळेस ही योजना आली त्यावेळेस आम्हाला जास्त वेळ मिळाला नाही. लगेच निवडणुका आल्या त्यामुळं तपासण्या करण्यासाठी वेळ मिळाला नाही. ज्यांना गरज आहे त्यांनीच याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले होते. मात्र, आता दिलेले पैसे तर परत घेता येणार नाहीत. यावर नक्कीच मार्ग काढू. आता कशाला कारवाई करायला सांगताय? मान्य आहे चुकलं, त्यांनी नको होतं करायला असेही अजित पवार म्हणाले. 

सगळेच आमदार गेल्यावर पक्षांतर बंदी कशी होईल

राष्ट्रावदी काँग्रेसच्या नागालँडमधील आमदारांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, दोन महिन्यापूर्वी सगळे आमदार मला भेटले होते. त्यांची तिथं काम होत नव्हती. अस्वस्थता होती ही गोष्ट खरी आहे. त्याबद्दलची अधिक माहिती घेत आहे. त्यांनी स्वतः मला भेटून तक्रारी केल्या होत्या. ते आमदार अस्वस्थ होते ही गोष्ट खरी आहे. सगळेच आमदार गेल्यावर पक्षांतर बंदी कशी होईल असेही अजित पवार म्हणाले. 

महिला अत्याचाराच्या बाबतीत देखील अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. तक्रारी केल्याशिवाय या घटना कमी होणार नाहीत. पुणे कार अपघाताची माहिती घेतली आहे. जखमी विद्यार्थ्यांची देखील माहिती घेतली आहे. MPSC च्या परीक्षेबाबत त्याच्या संदर्भातल्या ज्या संस्था आहेत त्या निर्णय घेतील असे अजित पवार म्हणाले. पुणे शहर शस्त्र परवानाबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, याची माहिती घेईल मी.लायसन द्यायचा जसा अधिकार आहे तसा तो रद्द करायचा पण आहे. कुणाकुणाला लायसन्स दिले आहे याची माहिती घेऊन त्यांना खरंच गरज आहे का? हे तपासले जाईल असे अजित पवार म्हणाले. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणावर बोलाताना अजित पवार म्हणाले की, आता हगवणे कुटुंबाला पकडलं आहे. त्यांची चौकशी चालू आहे. काही गोष्टी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यांना तपास करु द्या असे अजित पवार म्हणाले.