मुंबई : दोन वर्षांपूर्वीच्या त्या पहाटेच्या शपथविधीवरुन आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपलं मौन अखेर सोडलं आहे. लोकांना सारखी ती पहाट आठवते पण मला सांगायचं आहे की त्या दिवशी सकाळचे आठ वाजले होते असं उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत बोलताना म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन त्यांची खदखद अखेर बाहेर आल्याची चर्चा विधानभवनाच्या आवारात सुरु आहे


भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पहाटेच्या शपशविधीवरुन टोला मारला. त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, "मुनगंटीवारांना लगेच ती पहाट आठवते. त्यांना एक कळत नाही की त्या दिवशी पहाट नव्हती तर सकाळचे आठ वाजले होते. आता सकाळच्या आठला पहाट म्हणतात हे दुर्दैवी आहे."


अजित पवार भाजपसोबत जातील आणि सरकार स्थापन करतील असा कोणीही विचार केला नव्हता. त्या दिवशी सकाळी जो शपथविधी झाला ती शपथविधी राज्यात 'पहाटेचा शपथविधी' म्हणून प्रसिद्ध आहे. नंतर या दोघांचं सरकार स्थापण होऊ शकलं नाही किंवा त्यांना अपेक्षित बहुमत मिळवता आलं नाही ही गोष्ट वेगळी आहे. 


पण या पहाटेच्या शपथविधीवरुन राष्ट्रवादीला आणि प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना अनेकांनी अनेकदा टोमणे मारले. हे टोमणे कधी भाजपमधून मारले जायचे तर कधी महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडून. त्यावर या आधी अजित पवारांनी कधीही भाष्य केलं नव्हतं. पण आज राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरु असताना अजित पवारांनी अखेर मौन सोडलं. 


उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जरी हे वक्तव्य खेळीमेळीत केलं असलं तरी त्यातून त्यांची खदखद बाहेर आल्याची चर्चा दबक्या आवाजात विधानभवनाच्या परिसरात सुरु आहे. 


महत्त्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha