बारामती : बैलगाडा शर्यत चालू व्हावी अशीच राज्य सरकारची भूमिका आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे परवानगी देता येत नाही. सरकारपेक्षा कोर्टाच्या निर्णयाला महत्व आहे. बैल हा पाळीव प्राणी म्हणून न गणता वन्यप्राणी म्हणून गणला गेला. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेला प्रश्न आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते बारामतीत बोलत होते. ते म्हणाले की, संसदेत अनेकदा हा प्रश्न उपस्थित केला गेला. सध्या काहीजण स्टंटबाजी करत आहेत. जे स्टंट करतात त्यांचंच मागच्या पाच वर्षात सरकार होतं. त्यांना कोणीही अडवलं नव्हतं. आताही केंद्रात त्यांचंच सरकार आहे. सध्या केवळ लोकांची दिशाभूल करण्याचं काम सुरु आहे. आम्ही लोकांचं भलं करतोय असं दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, वास्तविक कोणत्याही पक्षाची किंवा पक्षविरहीत व्यक्ती असेल आणि त्यांच्याकडून कायद्याचे उल्लंघन होत असेल तर नियमानुसार त्यांच्यावर कारवाई होईल. गुन्हे दाखल केले जातील. अशा प्रकारे कोणतेही कृत्य चालणार नाही. लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर ज्या पद्धतीने सर्वांनी त्याचे पालन केलं.. कारण ते सर्वांच्या हिताचं होतं. मात्र आम्हीच नियम करायचे आणि आम्हीच स्पर्धा घेवून नियम मोडायचे हे आमच्या रक्तात नाही, असंही पवार म्हणाले.
मंदिरे उघडण्याबाबत ते म्हणाले की, सगळंच सुरळीत सुरु व्हावं या मताचे आम्ही आहोत. 700 टनापेक्षा जास्त ऑक्सिजनची गरज महाराष्ट्राला भासली तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल अशी भुमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. कोरोनाचं सावट कमी व्हावं, तिसरी लाट आपल्याकडे येवू नये असं आम्हाला वाटतं. त्याचवेळी लोकांना दर्शन घेता यावं, मंदिरांमध्ये जाता यावं अशीही आमची भुमिका आहे. मात्र जिथे मोठ्या संख्येने गर्दी होते, तिथे लगेचच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसून आले आहे. मध्यंतरी वारीच्या निमित्तानं वाखरी ते पंढरपूरदरम्यान काही किलोमीटर पायी वारीला परवानगी दिली.. त्यातून पंढरपूरला कोरोनाचं प्रमाण वाढलं असं ते म्हणाले, आजही काहीही तालुक्यात कोरोनाचा रुग्णदर चिंताजनक आहे. पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये ज्या प्रमाणात कोरोना रुग्णदर कमी झाला, त्या प्रमाणात बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला नाही. कोरोना प्रादुर्भाव वाढण्यामागे काय कारणे आहेत ती शोधून त्यानुसार उपाययोजना राबवण्याच्या सुचना प्रशासनाला दिलेल्या आहेत, असं ते म्हणाले.
अजित पवार म्हणाले की, सध्या पाऊस पडायला सुरुवात झालीय. सोयाबीनसारखी पिके धोक्यात आली होती.. मात्र आता या पावसाने त्या पिकांना संजीवनी मिळाली आहे.. ग्लोबल वॉर्मिंगचं संकट असल्यामुळे वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम सरकारने हाती घेतला आहे.. सर्वांनीच जर या संकटाबाबत गांभीर्य राखून जबाबदारीची जाणीव ठेवली तर या संकटावर आपण मात करु शकतो असं ते म्हणाले.
नगरपरिषद निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे.. सद्यस्थितीत राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि शिवसेना एकत्र सरकार चालवत आहे.. राज्यस्तरावरच्या आणि इतर महत्वाच्या निवडणुका लढवण्याबाबत वरीष्ठ पातळीवरचे नेते निर्णय घेतात.. स्थानिक स्वराज्य संस्थेबाबत त्या त्या जिल्ह्यात अधिकार देणार आहोत. याबाबत उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, छगन भुजबळ आम्ही सर्वजण बैठक घेवून निवडणुकांबाबत दिशा ठरवू, असंही ते म्हणाले.