मुंबई : अजितदादा अनंताच्या प्रवासाला निघून गेले आणि त्यांनी ज्याच्यासाठी रात्रंदिवस काम केलं त्या राष्ट्रवादीच्या भवितव्याची. काकांपासून फारकत घेऊन अजितदादांनी राष्ट्रवादीचा झेंडा रोवला, पण त्यांच्या शेवटच्या काही दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची चर्चा जोरात सुरू झाली होती. पण अजितदादांच्या जाण्याने अनेक राजकीय प्रश्न उपस्थित झाल्याचं दिसतंय. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व कोण करणार? 'ते' नेतृत्व अजितदादांसारखेच खरंच सर्वमान्य असेल का? अजितदादांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या हे कळकळीने वाटत होते. आता त्या प्लॅनला पुढे कोण आणि कसे नेणार? असे अनेक प्रश्न आज उपस्थित होत आहेत. 

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी अजितदादा आग्रही

खरंतर महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अजितदादांच्या मनातलं अनेकदा ओठांवर आलं होतं. महापालिका निवडणुकीसाठी अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. पुढची पायरी दोन्ही राष्ट्रवादी एक होण्यात होती की काय, असे संकेत दादांच्याच वक्तव्यांतून मिळत होते. 

आता दादांना आदरांजली वाहताना राष्ट्रवादीच्या जुन्या जाणत्यांनी हीच इच्छा बोलून दाखवली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, "आता सत्य बोलणं गरजेचं आहे. महापालिका निवडणुकीनंतर आपण एकत्र येऊ, असं अजित पवार म्हणाले होते, त्या अनुषंगाने बैठकाही झाल्या. अजितदादा हे शरद पवारांकडे पाहूनच हे बोलत होते. आता त्यादृष्टीनंच आमची वाटचाल होईल."

अंकुश काकडेंनी सांगितली दादांची इच्छा

दादांना अखेरचा निरोप दिल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंनी दादांची अखेरची इच्छा काय होती ते सांगितलं. ते म्हणाले की, "मला राहून राहून दुख होतंय... अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत यासाठी दादांनी मला आग्रह केला होता. तुम्ही, विठ्ठल शेट मणियार, श्रीनिवास पाटील तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, साहेबांशी बोला. दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील यासाठी प्रयत्न करा, असं ते म्हणाले होते. आम्ही जे प्रयत्न करता येणं शक्य होतं ते करत होतो, पण दुर्दैवाने त्यात यश आलं नाही.

राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार? 

फक्त शरद पवारांच्या पक्षाचेच नाही तर दादांच्या राष्ट्रवादीच्याही नेत्यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात असं मंत्री नरहरी झिरवाळ म्हणाले. केवळ नेतेच नाहीत तर कार्यकर्त्यांचीही हीच भावना असल्याचं दिसतंय. पण, ही घोषणा करण्याचं सौभाव्य नियतीनं अजितदादांच्या वाट्याला दिलं नाही, हेच कार्यकर्त्यासाठीचं मोठं दुखः

महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादींचं मनोमिलन झाल्यानंतर दादांनाही याच कार्यकर्त्यांच्या भावनांचा दाखला दिला होता. ज्या राष्ट्रवादीसाठी दादांनी काकांशी फारकत घेतली, ती राष्ट्रवादी पुन्हा एकत्र होण्याची घोषणा करण्याचं भाग्य नियतीनं दादांच्या वाट्याला येऊ दिलं नाही. दादांनी सांगितलेल्या कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आता पुढाकार कोण घेणार? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास त्याचं नेतृत्व कोण करणार? अनेक नेते मंडळींचे अस्तित्व आणि महत्व हे मुळात अजितदादांमुळे टिकून होते. आता अशांचे काय होणार?

राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसोबत कोण बसणार हा महाराष्ट्रासमोरचा प्रश्न. यातील काही प्रश्नांची उत्तरं ही थेट उत्तरं मिळू शकतात, पण काहींसाठी मात्र राजकीय स्थित्यंतरं पाहावी लागू शकतात.

ही बातमी वाचा: