Maharashtra NCP Political Crisis: अजित पवारांनी (Ajit Pawar) थोरल्या पवारांची साथ सोडली आणि राज्याच्या राजकारणातील (Maharashtra Politcs) समीकरणं पुरती बदलून गेलीत. अशातच अजित पवारांनी भाजपची (BJP) कास धरत उपमुख्यमंत्रीपदाची, तर त्यांच्यासोबतच्या इतर 8 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट अशा दोन गटांत विभागली गेली.


नवनिर्वाचित राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा खातेवाटप जाहीर झाल्यानंतर अजित पवार आमदारांसह थेट वाय.बी. सेंटरला शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. त्यावेळी शरद पवारांशी बातचित करुन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एवढंच नाहीतर काल (सोमवार) पुन्हा अजित पवारांनी काही आमदारांसह वाय. बी. सेंटरमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली आणि पुन्हा आमदारांच्या मनधरणीचा प्रयत्न केला. पण अजित पवारांकडून सातत्यानं थोरल्या पवारांच्या भेटीगाठी घेऊन सातत्यानं मनधरणीचा प्रयत्न का केला जातोय? तसेच, अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या काही आमदारांना नेमकी कसली चिंता सतावतेय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. 


अजित दादांकडून थोरल्या पवारांची चार दिवसांत तिसऱ्यांदा भेट 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची चार दिवसांत तिसऱ्यांदा भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी (17 जुलै) दुपारी शरद पवारांनाच आश्चर्याचा धक्का दिला. दोन डझनहून अधिक आमदार, त्यांच्या गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि इतरांसह अजित पवार अचानक वाय.बी. चव्हाण सेंटरला पोहोचले. नेमके त्याचवेळी शरद पवार त्यांच्या गटातील आमदारांची भेट घेण्यासाठी वाय.बी. चव्हाण सेंटरला येणार होते. शरद पवार वाय.बी. सेंटरच्या गेटवर पोहोचताच त्यांना माध्यमांची खूप गर्दी दिसली. ही गर्दी नेमकी कशासाठी अशी विचारणा शरद पवारांनी केली. त्यावेळी त्यांना अजित पवार वाय. बीला त्यांची भेट घेण्यासाठी आले असल्याची माहिती थोरल्या पवारांना मिळाली. तोपर्यंत अजित पवार भेटीसाठी आल्याची माहिती शरद पवारांना नव्हती. ते याबाबत अनभिज्ञ होते. 


अजित पवार अपात्रतेच्या नोटीसमुळे चिंतेत?


अजित पवारांकडून थोरल्या पवारांच्या वारंवार घेण्यात येणाऱ्या भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाही. मात्र असं म्हटलं जात आहे की, अजित पवार शरद पवार गटाकडून धाडण्यात आलेल्या अपात्रतेच्या नोटीसमुळे चिंतेत आहेत. शरद पवार यांच्यावतीने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यासह ज्येष्ठ नेते उपस्थित होते. रविवारी (16 जुलै) दुपारी अजित पवार यांच्यासह त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य नेत्यांनी शरद पवारांना फोन केल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच काल तिसऱ्यांदा अजित पवारांनी शरद पवारांची बैठक घेतली.


"शरद पवारांचे आशीर्वाद घेण्यास पक्षाचे आमदार इच्छुक"


रविवारच्या (16 जुलै) बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, आपण शरद पवार यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि फूट पडलेल्या राष्ट्रवादीत ऐक्य साधण्यासाठी गेलो होतो. थोरल्या पवारांनी शांतपणे सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं, पण त्यांची विनंती मान्य केली नाही, असंही प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. सोमवार (17 जुलै) बैठकीबाबत मंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, पक्षाचे आमदार शरद पवार यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे ते अजित पवारांसोबत त्यांच्या भेटीसाठी गेले आहेत. 


खातेवाटप जाहीर होताच अजित पवार सिल्वर ओकवर


"अखेर, आम्ही अजूनही एकाच पक्षात आहोत", असं दिलीप वळसे पाटलांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर अजित पवार गटाचेच मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार सर्व तर्क दूर करतील, असं म्हटलं होतं. यापूर्वी शुक्रवारी अजित पवार अचानक सिल्वर ओकवर दाखल झाले होते. बंडखोरीनंतर अजित पवारांनी थेट सिल्वर ओक गाठल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. अशातच काही वेळानं अजित पवार काकू प्रतिभा पवार यांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर गेल्याचं स्पष्ट झालं.