जालना :  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काल झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधान झाले. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज बारामतीत शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखोंचा जनसागर अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता. अजित पवार यांच्या निधनानंतर आज जालना इथं शोक सभा आयोजीत करण्यात आली होती. यावेळी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. दादांनी सकाळचा शपथविधी घेतला तो पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता, असं वक्तव्य भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे.  

नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी शोक कळा पसरल्यानंतर ठीक ठिकाणी राजकीय नेते मंडळी आता त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. आज जालना शहरात दादांच्या निधनानंतर सर्वपक्षीय शोक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री यांनी त्यांच्या आठवणीला उजाळा देताना मोठे विधान करत मजेदार किस्से सांगितले. दादांनी सकाळचा जो शपथविधी घेतला होता तो पहिला प्रयोग नव्हता तर तिसरा प्रयोग होता असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. शिवाय शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस  तिघ मिळून सरकार चालू असं ठरलं होतं, कोण मंत्री होणार पालकमंत्री होणार हेही ठरलं होतं मात्र मोठ्या (पवार) साहेबांनी सांगितलं की शिवसेना नको म्हणून पहिला प्रयोग फसला. त्यानंतर दुसराही प्रयोग फसला असल्याचं मोठं विधान रावसाहेब दानवे यांनी केलं.

बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये हजारोंच्या साक्षीनं अजितदादांना अखेरचा निरोप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये हजारोंच्या साक्षीनं अखेरचा निरोप देण्यात आला. काल बुधवारी बारामती विमानतळाजवळ धावपट्टीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारादरम्यान "अजितदादा अमर रहे" चा अखंड जयघोष करण्यात आल्या त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रमुख नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह अनेक नेते अंत्यसंस्काराला उपस्थित होते.  

प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात पोरका झालो असल्याची भावना

अजितदादांच्या अंत्यविधीला लोटलेली हजारो कार्यकर्ते चाहत्यांची गर्दी ही त्यांनी कमावलेली होती. अजितदादा या जगातून गेलेच नाहीत अशा भावना कार्यकर्त्यांच्या होत्या. अजूनही कार्यकर्ते निःशब्द आहेत. त्यांना अजूनही सुचत नाहीये. राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी पक्षासाठी मोठा यक्ष प्रश्न निर्माण होणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा मनात पोरका झालो असल्याची भावना आहे. सगळं संपल्यासारखं वाटतंय. दादा आधारस्तंभ होते. असा एकमेव नेता होता दर मंगळवारी आम्हाला बोलवायचे. आमच्या समस्या ऐकायचे. आमच्या मतदारसंघाच्या प्रत्येक कामाची वीट त्यांनी रचली आहे. काय करणार आम्ही आता? कुणाकडे बघणार अजून. आमच्या दृष्टीने आता सगळं संपलं आहे. असा दिवस कधी बघायला मिळेल असा आयुष्यात कधी विचार केला नव्हता. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते देत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

अजितदादांच्या आठवणीने आख्खं मंत्रालय गहिवरलं, कर्तव्यदक्ष, शिस्तबद्ध आणि वक्तशीर नेतृत्व गमावल्याच्या भावना