औरंगाबाद : ‘आज १० लाख जण आज फुटबॉल खेळले म्हणे पण एकदम कसे खेळायला आले? सराव नाही आणि लागले किक मारायला. अरे, फुटबॉल खेळायला आधी सराव लागतो हे कसं कळत नाही?’ असा टोला अजित पवार यांनी औरंगाबादेत लगावला. याचबरोबर अजित पवार यांनी क्रीडा मंत्री विनोद तावडेंवरही जोरदार टीका केली.

'विनोद तावडे यांच्याबद्दल काही बोलायला नको त्यांच्या खात्याचा बोजवारा उडाला आहे. असं म्हणतात कि त्यांना त्या खात्यात रस नाही. मात्र, त्यामुळे इतरांचा रस निघतो त्याचं काय?, आम्ही कधी विनोद तावडेंकडे गेलो की ते मला नेहमी म्हणतात आगामी ऑलम्पिकमध्ये आपल्याला 22 सुवर्ण पदकं मिळायला हवी. अरे काय... कशी मिळणार 22 सुवर्ण पदकं?, त्यासाठी खेळाडूंना चांगल्या सोयीसुविधा आणि प्रशिक्षण द्यायला नको?’ अशी टीका अजित पवारांनी केली.

दरम्यान, याचवेळी अजित पवारांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. ‘बुलेट ट्रेन सुरु करायला हरकत नाही. मात्र, सध्या रेल्वेचे काय हाल आहेत ते पण बघा. रोज एकतरी माणूस मरतोच त्याचं काय?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, यावेळी त्यांनी फडणवीस सरकारचा देखील समाचार घेतला. 'कर्ज माफीची कोणी माहिती देत नाहीत नुसतं तारीख पे तारीख सुरु आहे. लोडशेडिंग सुरु करण्यात आली, कोळशाचा साठा करून ठेवला नाही. इतकं दुर्लक्ष केलं जातं आहे.’ अशी चौफर टीका अजित पवारांनी सरकारवर केली.

VIDEO :