Chhatrapati Sambhajiraje :  राज्याचे दिवंगत पमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी (Baramati Vidhan Sabha By Election 2026) उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याआधी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मेळावा झाला. दरम्यान, काँग्रेसकडून देखीलउमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यावर छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje)  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रासाठी अजितदादांचं मोठं योगदान आहे. त्यामुळं बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहीजे होती असं छत्रपती संभाजीराजे म्हणाले. ते शिर्डीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नेमकं काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे ?

बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हायला पाहीजे होती, असे मत छत्रपती संभाजी राजे यांनी व्यक्त केले. अजितदादांचे महाराष्ट्रासाठी मोठं योगदान आहे. कर्तृत्ववान व्यक्ती गेल्यानंतर तिथे का निवडणूक झाली पाहीजे? असा सवाल देखील संभाजीराजे यांनी केला. सार्वत्रिक निवडणुकीत कोणीही उभं रहावं. ही निवडणुक मात्र बिनविरोध व्हावी. काँग्रेसने उमेदवार दिल्याच्या प्रश्नावर संभाजीराजे बोलत होते.  

अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी- सुनेत्रा पवार (Sunetra Pawar )

बारामतीच्या प्रत्येक वास्तुला अजितदादांचा स्पर्श आहे. बारामतीची प्रतिष्ठा जराही कमी होऊ देणार नाही. अजितदादांनी मताधिक्यांचे विक्रेम मोडून काढले आहेत. ही निवडणूक नाही, अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची संधी, असंही सुनेत्रा पवारांनी सांगितलं. अजितदादा शब्दाला जागणारे नेते होते. अजितदादांसाठी बारामती आईसारखी होती. बारामतीचा विकास पूर्वीसारखा वेगाने होईल. नवीन प्रकल्प, गुंतवणुकीसाठी मी प्रयत्न करेन, असं आश्वासन सुनेत्रा पवारांनी यावेळी दिलं. बारामतीमधील प्रत्येक नागरिक माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. मी तुम्हाला कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, असंही सुनेत्रा पवार म्हणाल्या. ही निवडणूक ही माझी नसून बारामतीकरांची आहे आणि बारामतीकरांचं अजितदादांवर किती प्रेम आहे, हे सांगायला नको. बारामतीकरांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली आहे. आजपर्यंत तुम्ही अजितदादांना साथ दिली, त्यापेक्षाही काकणभर (थोडी अधिक) मला जास्त साथ द्याल, असा विश्वास मला आहे, असं सुनेत्रा पवारांनी सांगितले.  

राहुरीत होणारी निवडणुकही भावनिक 

दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभा मतदारसंघाची देखील पोटनिवडणूक होत आहे.इथं भाजपने शिवावाजीराव कर्डीले यांचा मुलगा अक्षय कर्डीले यांना उमेदवारी दिली आहे. यावर देखील संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली. राहुरीत होणारी निवडणुकही भावनिक आहे. तिथेही तोच विचार करणं गरजेचं असल्याचे संभाजीराजे म्हणाले.