अहमदनगर : मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीमध्ये महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांना वगळले गेले आहे. त्यांच्या ऐवजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील या दोघांची वर्णी लागली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटामुळे हळूहळू भाजपच्या (BJP) नेत्यांना फटका सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. 


राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह नऊ मंत्र्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र या गटाच्या एन्ट्रीने शिंदे गटासह भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरल्याचे चित्र पाहायला मिळत होते. अशातच पुण्याचे पालकमंत्री असलेले भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आता शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यातच राज्य सरकारच्या महत्वपूर्ण असलेल्या पायाभूत सुविधा समितीतून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यांच्याऐवजी आता राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना संधी देण्यात आली आहे. मंत्रीमंडळ पायाभूत समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे तर त्याचे सदस्य देवेंद्र फडणवीस, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, रवींद्र चव्हाण, अतुल सावे आणि दादा भुसे आहेत. 


राधाकृष्ण विखे पाटील यांवर म्हणाले की, महायुती तयार झाल्यानंतर सगळ्या गोष्टींचा विचार करूनच निर्णय घ्यावे लागतात. हा निर्णय देखील मुख्यमंत्र्यांनी सारासार विचार करूनच घेतलेला असेल. या समितीत देवेंद्र फडणवीससुद्धा आहेत. त्यांचासुद्धा विचार या ठिकाणी असेल आणि महायुतीमध्ये समन्वय राहावा यासाठी हा निर्णय घेतला असावा, विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या समितीत असल्याने मी असलो काय आणि नसलो काय? त्यांनी काय फरक पडत नसल्याचं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नेते निर्णय घेत असतात आपलं काम अंमलबजावणी करण्याचा असतं. विरोधी पक्षाचे काम आहे भूमिका मांडणे मात्र संयम ठेवून काही वक्तव्य करणे आवश्यक असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं


काय काम करते ही समिती? 


राज्य सरकारकडून शासकीय इमारती, मोठे रस्ते, नवे पूल, मेट्रो प्रकल्प उभारले जातात. या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीकडून मान्यता घ्यावी लागते. या समितीमध्ये राज्यातील मंत्रीमंडळातील काही नेते असतात. दरम्यान या समितीमधून राधाकृष्ण विखे पाटील यांना वगळ्यात आले आहे. तर यामध्ये अजित पवार गटाचे दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लावण्यात आली आहे. नियोजन विभागाने 9 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पायाभूत सुविधा समिती गठीत केली होती. यामध्ये राज्यात राबविण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना अंतिम मंजुरी देण्याचे अधिकार असतात. समितीच्या सदस्यांची संख्या सातवरून आता आठ इतकी झाली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या : 


Radhakrishna Vikhe Patil : मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीतून विखेंची गच्छंती