अहमदनगर : दिवसेंदिवस राज्यात कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची प्रकरणे वाढत आहेत. ओमायक्रॉनचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकार सतर्क झाले आहे. यासंबधी राज्य सरकारने काही निर्बंध देखील लादले आहेत. अशातच अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. अहमदनगर जिल्ह्यात 'नो वॅक्सिन नो एन्ट्री' (No Vaccine No Entry) ही मोहिम राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यात ओमायक्रॉन पहिला रुग्ण सापडल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नो वॅक्सिन नो एन्ट्री ही मोहिम आजपासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी आणि लसीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत ज्यांनी लस घेतली नसेल त्यांना सार्वजनिक ठिकाणी जाऊ दिले जाणार नाही.
कशी आहे नवीन नियमावली
1) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना/कार्यालये,
व्यावसायिक व औदयोगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह,
लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच
सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात 'नो वॅक्सिन नो एन्ट्री' याप्रमाणे निर्बंध लागू केले आहेत.
2) वरीलप्रमाणे प्रत्येक आस्थापनांनी त्यांच्या कार्यस्थळी येणाऱ्या नागरिकांनी कोविड
प्रतिबंधात्मक लसीकरणाची किमान एक मात्रा घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहणार आहे. खात्री केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
3) कोविड-19 विषयक मार्गदर्शक सूचना, निर्देश आणि कोविड अनुरूप वर्तन तसेच राज्य व केंद्र शासन निर्णयातील अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
4) वरील ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीने योग्य पध्दतीने मास्क लावणे बंदनकारक करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालयातील (Jawahar Navodaya Vidyalaya) 19 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावात असलेली ही निवासी शाळा ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा भाग आहे. शाळेत पाचवी ते बारावीपर्यंत 400 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थ्यांना आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बहुतेक संक्रमित विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती तर आणि काहींमध्ये फक्त सौम्य लक्षणे होती, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे वाढता धोका टाळण्यासाटी प्रशासनाने जिल्ह्यात नो वॅक्सिन नो एन्ट्री ही मोहिम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.