धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन जंगलात पाच दिवस केले अत्याचार, अहिल्यानगर, हादरलं, तीन आरोपींना अटक
अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला तब्बल पाच दिवस जंगलात ठेवत अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
Ahilyanagar crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला तब्बल पाच दिवस जंगलात ठेवत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाला आता ‘लव्ह जिहाद’चा अँगल जोडला जात असून राजकीय वातावरणही तापलं आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
राहुरी पोलिसांची मोठी कारवाई, रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका
राहुरी पोलिसांनी मोठी कारवाई करत नाशिक-सुरत रोडलगत रामशेज किल्ला परिसरातील जंगलातून मुलीची सुटका केली आहे. मुख्य आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे. 13 फेब्रुवारी रोजी कॉलेजला जाते असं सांगून घराबाहेर पडलेली 15 वर्षीय मुलगी परतलीच नाही. पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची सूत्रं वेगाने हलवली आणि अखेर जंगल परिसरातून मुलीची सुटका करण्यात यश मिळालं.
पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली
या प्रकरणात मुख्य आरोपी मुक्तार हैदर पठाण , कौसर हैदर पठाण , आकाश शरद संसारे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपीवर अपहरण आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. पीडितेच्या जबाबानुसार पॉक्सो आणि लैंगिक अत्याचाराची कलमे लावण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ संबंधित मुलीच्या गावात बंद ठेवण्यात आला होता.
























