Agriculture News : मरण येतं, पण कर्ज जात नाही, ही शोकांतिका अनुभवणारे शेतकरी आजही न्यायासाठी रस्त्यावर आहेत. लातूर (Latur) जिल्ह्यातील सहदेव होणाळे आणि गणेश सूर्यवंशी या शेतकऱ्यांनी पाठीवर नांगर घेत 500  किमीची पायी पदयात्रा करत थेट मंत्रालय गाठण्याचा निर्धार केला आहे. आज त्यांच्या या संघर्षाचा नववा दिवस आहे.

डोळ्यांत अश्रू आहेत, पायात चपला नाहीत, फोड फुटले आहेत  पण मनात आहे फक्त एकच ध्यास  कर्जमुक्तीचा आणि न्यायाचा. आपली व्यथा मांडताना सहदेव होणाळे यांना अक्षरशः अश्रूंना बांध घालता आला नाही. ते म्हणाले व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून कर्जमाफी मिळते, मग आमचं रोजचं जगणं सरकारला दिसत नाही का? या दोघांनी 450 किमीहून अधिक अंतर पार केलं असून आज ते भिवंडीत दाखल झाले आहेत. चालताना त्यांच्या पायांवर फोड फुटले आहेत. पण नांगर जणू एक बाण बनवून, त्यांनी व्यवस्थेच्या हृदयावरच घाव घालायचं ठरवलं आहे.

शेतकऱ्यांच्या व्यथा मायबाप सरकारला कधी दिसणार? 

निवडणुकीच्या तोंडावर सरकार अनेक घोषणा करते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या गाजावाजा करतात, पण प्रत्यक्षात या घोषणा कधी वास्तवात उतरणार का? हा सवाल सहदेव यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्या मनात धगधगतोय. भाषणात आम्हाला हिरो बनवलं जातं. पण रस्त्यावर चालताना आम्ही कोण? सहदेव म्हणाले माझ्यावर दीड लाख कर्ज आहे ते मी कसेही फिडेल पण बाकी शेतकऱ्यांचं काय? अनेक शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांना न्याय कोण देणार एका वृद्ध शेतकऱ्याची व्यथा व्हायरल व्हिडिओमुळे दिसून येते. मग इतर शेतकऱ्यांच्या व्यथा मायबाप सरकारला कधी दिसणार? असा सवाल सहदेव होणाळे यांनी उपस्थित केला आहे.

राजकारण्यांनी राज्यात मराठा व ओबीसी समाजात भांडण लावण्याचं काम केलं 

राज्यात मराठा व ओबीसी समाजात राजकारण्यांनी भांडण लाऊन स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला गेला. दुर्दैव म्हणजे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या मूळ प्रश्नाला हात घालण्यासाठी ओबीसी समाजाचा सहदेव निघाला. त्याला साथ देण्यासाठी गणेश मराठा त्याच्या सोबत निघाले आहेत. देशातील शेतकऱ्याचा हा नांगर केवळ शेत नांगरत नाही तर तो सरकारच्या काळजाविना व्यवस्थेवर ही आता घाव घालत रस्त्यावर उतरला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बैलाऐवजी स्वतःलाचं औताला जुंपले, लातूरच्या शेतकऱ्याची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं घेतली दखल, जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस जारी