Agriculture News : आत्तापर्यंत राज्यात चांगला पाऊस (Rain) झाला आहे. मात्र, काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. त्यामुळं शेतकरी संकटात सापडले आहेत.  मराठवाडा (Marathwada)आणि विदर्भातील (Vidarbha) शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जुलै महिन्यात राज्यातील 26 जिल्ह्यातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात तब्बल 18 लाख 21 हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. त्यानुसार 22 लाख 89 हजार शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.


जुलै महिन्यात नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे झाले आहेत. त्या शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईपोटी अंदाजित बावीशे ते अडीच हजार कोटी रुपये मिळणार आहेत. त्याचा अहवाल कृषी विभागाने सरकारला सादर केला आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यात ऑगस्टमधील बाधित शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे.


या 26 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा


अतिवृष्टीमुळे जुलै महिन्यात राज्यातील 26 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, पुणे, सांगली, कोल्हापूर, हिंगोली, लातूर, नांदेड, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, नागपूर, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या 26 जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यातील 18 लाख 21 हजार हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालं होतं. जवळपास 22 लाख 89 हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता. या सर्व शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे.
 
आत्तापर्यंत अतिवृष्टीमुळं राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत 


राज्यात अतिवृष्टीचा खूप मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीनं राज्यातील 81 लाख 2 हजार हेक्टर जमीन बाधीत झाली आहे. यामध्ये जिरायती क्षेत्र 17 लाख 59 हजार 633 हेक्टर असून, बागायती क्षेत्र 25 हजार 476 हेक्टर आहे. फळ पिकांमध्ये 36 हजार 294 हेक्टर एवढे क्षेत्र बाधित झाले असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. अतिवृष्टी आणि पूर यामुळं आत्तापर्यंत सुमारे 138 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांना चार लाख रुपये तातडीची मदत केली आहे. 21 हजार व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या: