कोल्हापूर : पुणे शहरात दोन वेळा गवा घुसल्यानंतर कोल्हापूर शहराच्या उपनगरामध्ये देखील चार गव्यांचे दर्शन नागरिकांना झाले आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. कोल्हापूर शहराला लागून असणाऱ्या लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा या परिसरात नागरिकांना गव्याच्या कळपाचे दर्शन झालं. काल रात्री गवे पाहिल्यानंतर आज पहाटे देखील फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना उसाच्या शेतात गवे आढळून आले. या घटनेनंतर वनविभाग, पोलीस दल आणि अग्निशमन दल यांच्याकडून गव्याच्या कळपाचा शोध सुरू झाला आहे. लक्षतीर्थ वसाहत, सुतार मळा या परिसरात उसाची शेती आहे. त्याचबरोबर जंगलाचा भाग देखील येतो. त्यामुळे गावे जंगलातून खाली उतरून उसाच्या शेतीपर्यंत पोहोचले आहेत. आता अग्निशमन दलाने बॅरिकेट लावून या परिसरातील वाहतूक बंद ठेवली आहे. गवे कोल्हापूर शहरात घुसू नये याच्यासाठी वन विभाग आपली टीम घेऊन त्या ठिकाणी सज्ज झाले आहेत.
पुण्यात एका गव्याचा मृत्यू
तीन आठवड्यांपूर्वी (8 डिसेंबर) पुण्यातील कोथरुड भागात सकाळी रानगवा आढळून आला होता. त्यानंतर या गव्याला बघण्यासाठी आणि त्याचे फोटो आणि व्हिडीओ हातातील मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी लोकांची जी गर्दी उसळली त्यामुळे हा गवा बिथरला आणि सैरावैरा पाळायला लागला. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर या गव्याला पकडण्यात यश आलं खरं पण या सगळ्या गोंधळात गव्याचा मात्र मृत्यू झाला.
वनविभागानं सांगितलं होतं की, लोकांनी जो गोंधळ केला, या गव्याचा जो पाठलाग केला त्यामुळे या गव्याच्या शरीराचं तापमान वाढलं आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात आला. उपवनसरंक्षक राहुल पाटील यांच्या मते गव्याला ट्रँक्विलाइज करण्यासाठी इंजेक्शन दिल्यानंतर तो बेशुद्ध होईपर्यंत काही वेळ थांबावं लागतं. परंतु इथे हा गवा बिथरल्याने सतत पळत होता आणि त्यामुळे त्याच्या शरीराचं तापमान वाढून त्याचा मृत्यू झाला.एका गव्याचा मृत्यू झाल्यानंतर पुण्यात पुन्हा एकदा गव्याचं दर्शन झालं होतं. बावधन परिसरात हा गवा आढळला होता.