पंढरपूर : गेल्या काही वर्षांपासून आर्थिक अडचणीमुळे कायम चर्चेत राहिलेल्या करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना अखेर पवारांनी 25 वर्षासाठी भाडे तत्वावर घेतला आहे. यामुळे आमदार रोहित पवार यांचे राजकारण सुरळीत होणार असले तरी या परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचाही मोठा प्रश्न सुटणार आहे. पवारांच्या बारामती ॲग्रोने दरवर्षी 6 कोटी रुपये भाडे, दर टनामागे 100 रुपये या प्रमाणे कर्जापोटी द्यावे लागणार असून कारखान्यातील कामगारांचा पगार, मेंटेनन्स आणि नवीन उपक्रम हे स्वतःच्या खर्चाने करावे लागणार आहेत.
राजकारणाचा अड्डा बनल्याने अडचणीत आलेल्या आदिनाथ कारखान्याच्या डोक्यावर शासनाचे 128 कोटी कर्ज असून याशिवाय कामगार व शेतकऱ्यांची देणी वेगळी आहेत. दोन वर्षांपासून बंद असलेला हा कारखाना सुरु करायलाच पवार याना भरपूर खर्च करावा लागणार असून कारखान्याची गाळप क्षमता वाढवणे व उपपदार्थ प्रकल्प सुरु करायलाही मोठे भांडवल गुंतवावे लागणार आहे. गेल्या काही वर्षांपासून अडचणीत आलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मात्र उद्ध्वस्त झाला होता. अशावेळी पवारांच्या बारामती अॅग्रोकडून हा कारखाना चालवायला घेतल्याने शेतकऱ्यांच्या अशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.
आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ असलेल्या कर्जत जामखेडमधील 25 गावांचे कार्यक्षेत्र आदिनाथ कारखान्यात असल्याने याचा चांगला राजकीय फायदा रोहित पवार यांना मिळू शकणार आहे. भाजपचे माजी मंत्री आणि धनगर समाजाचे नेते राम शिंदे याना पाडून गेल्या विधानसभेत रोहित पवार आमदार झाले असले तरी मतदारसंघ बांधण्यासाठी हा कारखाना त्यांना राजकीयदृष्ट्या खूप फायदेशीर ठरणार आहे.
आदिनाथ साखर कारखान्यावर राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज असल्याने या बँकेने हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया सुरू केली होती. गेल्या 15 वर्षांपासून आदिनाथ कारखान्यावर रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखालील बागल गटाची एकहाती सत्ता होती. मात्र संचालक मंडळामधील मतभेद, योग्य नियोजनाचा अभाव, संचालकांचे अंतर्गत एकमेकांवर होणारेआरोप-प्रत्यारोप या विविध कारणांमुळे कारखाना अडचणीत आला. मंगळवारी 12 जानेवारी रोजी मुंबई येथे राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या लिलाव प्रक्रियेत हा कारखाना रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोला देण्यात आला आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा मागील दहा वर्षापासून रखडत रखडत चालत असल्यामुळे कारखान्यावर कोट्यावधी रुपयांचे कर्ज झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना कारखाना जवळ असूनही बाहेरील कारखान्यास ऊस द्यावा लागत होता. कारखाना राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या कुटुंबातील कोणीतरी चालवण्यासाठी घ्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. कारखान्यातील कामगारांच्या पगाराचा प्रश्नही महाराष्ट्रमध्ये चांगलच गाजला होता. अशातच कारखान्यावरील कर्जाचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना कारखाना वारंवार बंद अवस्थेत राहत होता. त्यामुळे कारखाना विकला जाणारा की? भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला जाणार याबाबत उलटसुलट चर्चा होती. आदिनाथ कारखाना भाडेतत्वावर घेण्यासाठी आमदार रोहित पवार उत्सुक असल्याचे वारंवार राजकीय जाणकार मंडळीमधून बोलले जात होते. या शर्यतीत करमाळ्याचे आ. संजय शिंदे हे देखील होते. परंतु यामध्ये बारामतीकरांच्या एन्ट्रीमुळे संजयमामा शिंदे यांनी माघार घेतल्याचे स्पष्ट झाले. आता बारामती अॅग्रोमुळे जेऊर करमाळा परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मोठी काळजी संपली असून रोहित पवार याना कर्जत जामखेड मतदारसंघात जम बसवणेही सोपे जाणार आहे.