अकोला : राज्यात सध्या कोरोना, त्यावरून रंगलेलं राजकारण, आरोग्य यंत्रणेची वाताहत, रेमेडेसिवीर इंजेक्शन आदी गोष्टींवरून वातावरण चांगलंच तापलं आहे. या मुद्द्यांवरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज राजकीय आरोपाच्या फैरी झडत आहेत. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या एका फेसबुक पोस्टची सध्या 'सोशल मीडिया'त चांगलीच चर्चा आहे. तेजस्विनी पंडित यांनी राज्यात कोरानामुळे स्थिती बिघडत असतांना सुरू असलेल्या राजकीय चिखलफेकीवर सडेतोड शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या या 'फेसबुक पोस्ट'ची नेटीझन्समध्ये आज चांगलीच चर्चा आहे. अनेकांनी तेजस्विनी यांच्या उद्वेगाचं समर्थन केलं आहे. तर काहींनी त्यावर उलट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
काय लिहिले आहे तेजस्विनी पंडित यांनी आपल्या 'पोस्ट'मध्ये :
"सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे राजकारण. ही कीड कोविडपेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्ष आपल्याला पोखरत जाणारी आहे. या कीडीपासून बचाव करता आला तर बघा', असं तिनं या पोस्टमध्ये लिहिलं. परिस्थिती नेमकी किती बिकट आहे हे सांगताना, 'अवघड आहे सगळंच.... काळजी घ्या"...
राजकारण ही कोविडपेक्षा भयाण कीड; तेजस्विनी पंडितचा संताप अनावर
तेजस्विनी पंडित यांना राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीचे प्रत्युत्तर :
दरम्यान, तेजस्विनी पंडित यांच्या 'फेसबुक पोस्ट'नंतर राष्ट्रवादीच्या चित्रपट, कला आणि सांस्कृतिक विभागाने यावर आपली प्रतिक्रिया 'एबीपी माझा'कडे व्यक्त केली आहे. यासंदर्भात बोलतांना चित्रपट आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी पंडित यांना सर्वच राजकीय नेत्यांना एकाच तराजूत न तोलण्याचं आवाहन केलं आहे. ते पुढे बोलतांना म्हणाले की, 'जगातल्या सर्व लोकशाहींपेक्षा आपल्या देशातील राज्यघटना प्रभावी आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटनेतून सर्वांना समतेचे अधिकार दिला आहे. जगात प्रतिष्ठीत असलेले राज्यघटना ज्यावेळेस लिहिली गेली त्या वेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यात येणाऱ्या अडचणींना विचार तेव्हाच करून त्यामध्ये अनेक अशा कलमांच्या तरतुदी करून ठेवल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेप्रमाणे या देशाचा राज्यकारभार चालतो. त्यामुळेचं शासकीय यंत्रणांवर अंकुश असावा यासाठी राजकीय यंत्रणेची निर्मिती झाली आहे. शासन आणि प्रशासन असे महत्वाचे दोन घटक या देशाचा कारभार चालवतात. त्यामुळे फक्त राजकारण्यांंना नाव ठेऊन काय उपयोग?, असा सवाल पाटील यांनी यावेळी पंडित यांना केला आहे.
यावेळी वयाच्या ऐंशीव्या वर्षी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करीत असलेली धावपळ, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आईच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशीच कामकाज सांभाळल्याचे उदाहरण पाटील यांनी पंडित यांना दिले. शासकीय अधिकारी कुठल्या वाईट परिस्थितीत काम करतात?, याचा अनुभव पंडित यांना कधी आला का?, असा सवालही यावेळी पाटील यांनी तेजस्विनी पंडित यांना केला.
अभिनेत्री शिखा मल्होत्राच्या आदर्शाचं दिलं उदाहरण :
सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी एकत्र येऊन काम करणं महत्त्वाचं आहे. राजकारणावर टीका करण्यापेक्षा एक कलावंत म्हणून आपण लोकांसाठी काय करू शकतो, याचा विचार करण्याचा सल्लाही पंडित यांना देण्यात आला. यासाठी अभिनेत्री शिखा मल्होत्राचं उदाहरण पंडित यांना देण्यात आलं. गेल्या वर्षी बॉलिवूड अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिने थेट रुग्णसेवेचा पर्याय निवडला. जोगेश्वरीमधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये शिखा ड्युटी केली आहे. शिखा मल्होत्रा ही एक अभिनेत्री आहे. शिखाने संजय मिश्रा यांच्यासोबत ‘कांचली’ या समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटात काम केलं आहे. जर एक अभिनेत्री हे करू शकत होती तर आपणही काहीतरी करू शकतो असे बाबासाहेब पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. तसेच तेजस्विनी पंडित यांनी केलेल्या टीकेमुळे त्यांनी सर्वच राजकारण्यांना एका पारड्यात ठेवून चांगले काम करणाऱ्या राजकारण्यांना विनाकारण आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, ही बाबच मुळात चुकीची आहे असेही त्यांनी म्हटलं आहे.