मुंबई : 'कार्यक्रम खेळता ठेवण्यासाठी गंमत म्हणून राहुल गांधींचा चरित्रपट करायचा विषय काढला', अशा आशयाची फेसबुक पोस्ट अभिनेता सुबोध भावे याने केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या पुण्यातील विद्यार्थी संवाद कार्यक्रमात सुबोधने राहुल गांधींचा बायोपिक करणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यावर सुबोधने फेसबुक पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. 'मी रंगभूमीचा कलाकार आहे. रंगभूमी मला माणसाला समजून घ्यायला शिकवते,सर्वांशी आदरानी आणि प्रेमानी वागायला शिकवते. रंगभूमी कोणालाच अस्पृश्य समजत नाही आणि मी ही समजत नाही. माझे संस्कार मला माणसांमध्ये भेदाभेद शिकवत नाहीत', असे सुबोधने या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. सुबोध भावेची फेसबुक पोस्ट : तसेच आजपर्यंत आपण मोहन भागवत, शरद पवार,देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, रामदास आठवले या सर्वांना भेटलो असून त्यांच्याविषयी मनात आदर आहे. राहुल गांधी यांना देखील त्याच आदर आणि प्रेमानी भेटलो, असे देखील सुबोधने म्हटले आहे.