Nana Patekar : उपमुख्यमंत्री अजित पवार हे शांत राहून आपलं काम करत असतात. एखादी गोष्ट चुकली तर तेवढीच अधोरेखित होते. परंतु, त्यांनी केलेलं काम समोर आणलं पाहिजे, ते खरंच चांगले नेते आहेत. अजित पवार जेवढी कामं करतात त्याची जाहिरात कधीच करत नाहीत, अशी स्तृती अभिनेते नाना पाटेकर यांनी केली आहे. 


नाना पाटेकर म्हणाले, "आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते. परंतु, राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही. पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नका. म्हणजे कोणीही पक्ष बदलणार नाही. पक्ष बदलाला काहीतरी नियम असायला पाहिजेत. किमान शिक्षणाची तरी अट पाहिजे."


नाना पाटेकरांकडून अमोल कोल्हे यांची पाठराखण
यावेळी बोलताना नाना पाटेकर यांच्याकडून खासदार अमोल कोल्हे यांची पाठराखण करण्यात आली. नाना पाटेकर म्हणाले, "अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न असून तीस वर्षांपूर्वी मी सुद्धा नथूराम गोडसेची भूमिका केली आहे. मी भूमिका केली म्हणजे मी त्यांचं समर्थन करत नाही. मी गोडसेची भूमिका का केली, ते माझं उपजीविकेचे साधन आहे, यात माझी काय चूक आहे? असा प्रश्न उपस्थित करत नाना पाटेकर म्हणाले, प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायची गरज नाही. शिवाजी महाराजांची भूमिका केली त्यावेळी तुम्ही त्यांना का विचारले नाही, ही भूमिका का केली? त्यावेळी कलाकार म्हणून कोल्हे यांना मान्य केलं. मग आता का नाकारत आहात? असा प्रश्न नाना पाटेकर यांनी यावेळी उपस्थित केला. 


कोरोनाचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत
दरम्यान, नाना पाटेकर यांनी कोरोनाबाबतही आपले मत व्यक्त केले. "कोरोनाचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत. कोविडच्या काळात नाती समजली. कोरोनाने सर्वांनाच जमिनीवर आणलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करेलच, परंतु, आपण सर्वांनी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन नाना पाटेकर यांनी केले. 


महत्वाच्या बातम्या