बीड : बाळ जन्मल्याची चुकीची नोंद केल्याप्रकरणी बीड जिल्हा रुग्णालायातील डॉक्टरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यातील दोन डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यात आलं आहे, तर इतर दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी आरोग्य उपसंचालकांना प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.


बीडमधील बाळ अदलाबदल प्रकरणाने मागचा पंधरवडा चांगलाच गाजला. जिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मुली ऐवजी मुलगा जन्मल्याची नोंद करण्यात आली. या चुकीच्या नोंदीमुळे अनेक गैरसमज होऊन मुलाची अदलाबदल झाल्याच्या संशयावरुन माता-पित्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला.

घटना कशी समोर आली?

डीएनए तपासणीनंतर जिल्हा रुग्णालयातील ही घोडचूक उघडकीस आली. हा हलगर्जीपणा डॉ.दीपाली मोराळे, डॉ. अनिल कुत्ताबादकर, डॉ. परमेश्वर बडे आणि चार परिचारीकांनी केल्याचं समोर आल्याने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यातील डॉ. कुत्ताबादकर आणि डॉ. बडे यांना कार्यमुक्त करण्यात आलं असून डॉ. मोराळेसह इतर चार परिचारीकांवर प्रशासकीय कारवाई करण्याती यावी, यासाठी आरोग्य उपसंचालकांना प्रस्ताव सादर केला आहे.

छाया राजू थिटे (हिंगोली, ह.मु.रा.कुप्पा ता.वडवणी) या महिलेने 11 मे रोजी सायंकाळी 4.45 वाजता बाळाला जन्म दिला. त्याची नोंद प्रसुती विभागात झाली. त्यानंतर वजन कमी असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल केलं. मात्र येथील डॉक्टरांनी त्याला खाजगी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. यावेळी येथेही मुलाची नोंद केली.

त्याप्रमाणे रात्रीच बाळाला बीड बसस्थानकासमोरील श्री बाल रुग्णालयात दाखल केलं. येथील डॉक्टरांनी मात्र मुलगी अशी नोंद केली. बाळावर 10 दिवस उपचार केल्यानंतर सुट्टी दिली. यावेळी नातेवाईकांच्या हाती मुलगी पडल्याने ते भांबावले आणि त्यांनी संताप व्यक्त करत बाळ स्वीकारण्यास नकार दिला.

नातेवाईकांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी डॉक्टर आणि परिचारीकांचे जबाब नोंदवले आणि बाळाचं रक्त घेऊन डीएनए तपासणीसाठी पाठवलं. हा अहवाल बुधवारी मिळाला आणि ते बाळ थिटे यांचंच असल्याचं स्पष्ट झालं.

जिल्हा रूग्णालयातील शुभांगी नाईकवाडे, सपना राठोड, संगिता बनकर्न, सुनिता पवार या चार परिचारीकांसह डॉ.दीपाली मोराळे, डॉ.परमेश्वर बडे आणि डॉ. अनिल कुत्ताबादकर यांच्या हलगर्जी आणि गलथान कारभारामुळेच हा प्रकार झाल्याचं समोर आलं.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी याची गंभीर दखल घेत यामध्ये दोषी असणाऱ्यांवर कारवाईला सुरुवात केली. यातील कंत्राटी असणाऱ्या डॉ. बडे आणि डॉ. कुत्ताबादकर यांच्यावर कार्यमुक्तीची कारवाई केली. तर चार परिचारीका आणि मुलगाच आहे असे सांगणाऱ्या डॉ. मोराळे यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी, यासंदर्भात प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठवला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा मलीन झाली आहे. या दोषींवर तात्काळ करवाई करुन प्रतिमा उंचावण्याचं आव्हान जिल्हा रुग्णालयासमोर आहे.

'ती' तान्हुली पुन्हा अनाथ, आई-वडिलांचे हात वर

कुणावरही येऊ नये अशी वेळ बीड जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या 22 दिवसांच्या तान्हुलीवर आली आहे. ही मुलगी आपली नसल्याचं आई-वडिलांचं म्हणणं आहे, ज्यामुळे या मुलीला जन्मल्यापासून अजून मातृत्त्वाची ऊबही मिळू शकलेली नाही. अखेर पुन्हा एकदा ही मुलगी अनाथ झाली आहे.

मोठ्या गोंधळानंतर या मुलीचा ताबा आई-वडिलांना देण्यात आला होता. मात्र आपण ही मुलगी सांभाळण्यासाठी समर्थ नाही, असा अर्ज थिटे दाम्पत्याने बीड जिल्हा महिला आणि बालकल्याण समितीकडे दिला. समितीने दाम्पत्याचं समुपदेशनही केलं, मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर या चिमुकलीची रवानगी औरंगाबादच्या शिशुगृहात करण्यात आली आहे.

रुग्णालयाच्या एका चुकीमुळे तान्हुली 21 दिवस आईच्या दुधाविना!