पंढरपूर : पंढरपूर पंचायत समिती सभापतीपदी राजश्री भोसले यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या ओझेवाडी या गावी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत जेसीबीच्या साहाय्याने गुलाल उधळत जल्लोष करणाऱ्यांवर एबीपी माझाच्या बातमीनंतर गुन्हा दाखल झाला आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी नवीन उपसभापती राजश्री भोसले त्यांचे पती पंडित भोसले यांच्यासह 76 कार्यकर्त्यांवर भादवी 269, 270, 188, 143 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2004 चे कलम 51 ब , महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 व साथरोग प्रतिबंधक कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंढरपूर पंचायत समितीच्या निवडी झाल्यानंतर रात्री ओझेवाडी येथे मारुती मंदिरासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी जमून गावातून फटाक्यांची आतषबाजी, करत जेसीबीच्या साहाय्याने गुलाल उधळत मिरवणूक काढली होती. यात कोरोनाचे कोणतेच नियम पाळले गेले नव्हते. एका बाजूला सर्वच राजकीय नेते कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन करीत असताना स्थानिक नेते मात्र या नियामक हरताळ फासत असल्याचे या घटनेवरून समोर आले होते. रात्रीच्या या जल्लोषाबाबत तालुका पोलिसांना कोणतीच खबर लागली नाही. सोशल मीडियावर या क्लिप व्हायरल झाल्यावर पोलीस खडबडून जागे झाले.
ओझेवाडी मधील हा गोंधळ ABP माझाने दाखवल्यानंतर पोलीस प्रशासन जागे झाले आणि त्यांनी उपसभापती राजश्री भोसले आणि त्यांच्या 76 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. वेळापूरला पोलीस कर्मचाऱ्याच्या वाढदिवसाचा प्रकार ABP माझाने समोर आणल्यावर पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता सलग दुसऱ्या दिवशी ABP माझाच्या दणक्याने पंचायत समिती उपसभापती आणि 76 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे .