Dhule Accident News : धुळे शहराजवळील मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमका अपघात कसा झाला? कोणाची चूक होती? याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही.
दुचाकीवर एक व्यक्ती आणि त्याची पत्नी दोन मुलांसह मालेगावकडे जात असताना अपघात
मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघातात एका व्यक्तीसह दोन वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान, या दोघांचाही मृत्यू झाला आहे. तसेच एक महिला गंभीर जखमी आहे. त्या महिलेवर उपचार सुरु आहेत. दुचाकीवर एक व्यक्ती आणि त्याची पत्नी दोन मुलांसह मालेगावकडे जात होती. यावेळी ही अपघाताची घटना घडली आहे. दरम्यान, या अपघातात मृत्यू झलेल्यांची नावे समजू शकली नाहीत.
चालत्या ईर्टीगा गाडीने घेतला पेट, सुदैवाने गाडीतील चार जण सुखरुप
चालत्या ईर्टीगा गाडीने भीषण पेट घेतल्याची घटना परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील विटा गावाजवळ घडली आहे. सुदैवाने या गाडीतील चार जण ही वेळीच खाली उतरल्याने कुठलीही जीवितहाणी घडली नाही. बघता बघता गाडी पूर्णतः जळून खाक झाली. मिळालेल्या माहितीनुसार ही सय्यद झाकिर हे विटा गावातून सोनपेठ कडे दुपारच्या सुमारास त्यांच्या ईर्टीगा गाडीने निघाले होते. मात्र गावच्या बाहेर जाताच गाडीतून धूर निघू लागल्याने गाडीतील चारही जण 0बाहेर पडले आणि गाडीने भीषण पेट घेतला. बघता बघता आगीने अक्षरशः रौद्र रूप धारण केले आणि काही वेळातच गाडी पूर्णतः जळून खाक झाली.
छत्रपती संभाजीनगर जिल्हातील लासूर स्टेशन परिसरात डिझेलने भरलेल्या टँकरला अचानक भीषण आग लागली आहे. काही क्षणातच टँकर ज्वाळांनी वेढला गेला. त्यामुळं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. धुराचे मोठे लोट पसरल्याने नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलवण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव लासूर स्टेशन–देवगाव रोड हा मार्ग दोन्ही बाजूंनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून पोलिसांकडून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येत आहे.
सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.