मुंबई : आज (21 मार्च) महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेला अनेक केंद्रावर विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे पहायला मिळाले आहे. राज्यभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केली होती. यानंतर राज्यभर विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्तपणे आंदोलन करत परीक्षा घेण्यास सरकारला भाग पाडले. मात्र, प्रत्यक्षात परीक्षा देताना अनेक उमेदवारांनी दांडी मारल्याचे पहायला मिळाले आहे.
परभणीत 1400 परीक्षार्थी गैरहजर
परभणीत 15 परीक्षा केंद्रांवर आज दोन सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडली. सकाळी 10 ते 12 या वेळेत पहिला पेपर पार पडला. ज्यात 3907 पैकी 2508 विद्यार्थी उपस्थित राहिले तर 1399 परीक्षार्थी अनुपस्थित होते तर दुपारी 3 ते 5 यावेळत झालेल्या दुसऱ्या पेपरला याहून कमी परीक्षार्थी उपास्थित होते. या पेपरला 3907 पैकी 2498 जणांनी परीक्षा दिली तर तब्बल 1409 परीक्षार्थी अनुपस्थित राहिलेत. जेव्हा 14 मार्च रोजी होणारी परीक्षा चौथ्यांदा रद्द झाली. तेव्हा या विरोधात राज्यभरात आंदोलन झाले होते. परभणीतही या परीक्षार्थींनी आंदोलन केले होते. मात्र, प्रत्यक्ष परीक्षा झाली तेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर परीक्षार्थी अनुपस्थित राहिल्याने भावी अधिकारी आपल्या परीक्षेबाबत किती सजग आहेत हे स्पष्ट झालंय.
नाशिकमध्ये 6 हजाराहून अधिक विद्यार्थी गैरहजर
नाशिकमध्येही अनेक केंद्रावर पार पडलेल्या एमपीएससी परीक्षेत 6 हजाराहून अधिक विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे पहायला मिळाले. नाशिकमध्ये 46 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला एकूण 18 हजार 71 विद्यार्थी बसणार होते. सकाळच्या सत्रात 11,801 विद्यार्थी हजर तर 6,270 विद्यार्थी गैरहजर. दुपारच्या सत्रात 11,748 विद्यार्थी उपस्थित तर 6,323 विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचे समोर आले आहे.
सोलापुरात एमपीएससी परीक्षेला 3 हजारहुन अधिक विद्यार्थ्यांची दांडी
सोलापुरात एमपीएससी परीक्षेला 3 हजारहुन अधिक विद्यार्थ्यांनी दांडी मारल्याचं समोर आलंय. एकूण 8 हजार 879 विद्यार्थी परीक्षा देणार होते. दोन सत्रात झालेल्या परीक्षेत पहिल्या सत्रात 5 हजार 340 विद्यार्थी उपस्थित तर 3 हजार 539 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. तर दुसऱ्या सत्रात 5 हजार 328 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा तर 3 हजार 551 विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI