Majha Katta : संगीत देवबाभळी हे केवळ नाटक नसून तो थेट विठ्ठलाशी जोडणारा सांगतिक अनुभव असल्याचं मत टीम देवबाभळीने व्यक्त केलं. या नाटकामध्ये तुकोबा, विठ्ठल, आवली आणि रखुमाई या चौघांचं एकमेकांशी असलेल्या भांडणाला एका चौकोनाच्या माध्यमातून मांडण्यात आलं असल्याचं या टीमने सांगितलं. मराठी नाट्यभूमीवरील काही संस्मरणीय नाटकांपैकी एक असलेल्या संगीत देवबाभळी या नाटकाची टीम आज माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये आली होती.  


तुकोबांना न्याहरी नेत असताना भंडारा डोंगरावर त्यांची पत्नी आवलीच्या पायात रुतलेला काटा विठोबा काढतो, नेमक्या याच संकल्पनेवर हे नाटक आहे. संगीत देवभाबळी हे नाटक प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली संस्थेची निर्मिती आहे. तुकोबांची पत्नी आवली आणि विठ्ठलाची पत्नी रखुमाई या दोघींचे संवाद असलेलं हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचं दिसतंय. थेट विठ्ठलाशी जोडणारा सांगतिक अनुभव संगीत देवबाभळी या नाटकाच्या माध्यमातून मिळतोय. आतापर्यंत या नाटकाला 44 पुरस्कार मिळाले असून या नाटकाची 400 व्या प्रयोगाकडे वाटचाल सुरू आहे.  


हे नाटक आवलीची व्यथा मांडणारं 


रखुमाईची भूमिका साकरणाऱ्या मानसी जोशीने सांगितलं की, हे नाटक म्हणजे आवलीची व्यथा मांडणारं नाटक, तिला केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेलं. या नाटकात आवलीपेक्षा रखुमाईला तुलनेनं कमी गाणी आणि संवाद. त्यावर मी दिग्दर्शकाशी चर्चा केली. त्यावेळी त्यानं सांगितलं की, तसं नाही, आजपर्यंत आवली लोकांना माहिती आहे. रखुमाईची भूमिका कुठेही तशी मांडली गेली नाही. पण सुरुवातील काम करताना काहीशी इनसिक्युरिटी वाटत होती. नंतर काम करताना ती कमी झाली. कारण रखुमाईलाही तेवढा स्पेस दिला आहे, त्याच ताकतीने ती लोकांसमोर येते. 


एखाद्या पात्राबद्दल हेवा वाटतो, आत्मियता वाटते. पण हे नाटक पाहिल्यानंतर प्रेक्षकांना मात्र दोन्ही पात्रांबद्दल तितकीच आत्मियता वाटते हे या नाटकाचं यश असल्याचं संगीत देवभाबळी टीमने सांगितंल. 


माझी सुटका झाल्याचा भास होतोय.... 


नाटकाने प्रेक्षकांना खूप दिलंय पण तुम्हाला यातून काय मिळालं, नाटकाने तुम्हाला काय दिलं असा या टीमला प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी दिग्दर्शक प्राजक्त देशमुख म्हणाला की, तुकारामाची गाथा आणि तशी पुस्तकं माझ्या हाताच चार-पाच दिवसांपेक्षा जास्त असतील तर ती माझ्याकडून काढून घे असं माझ्या बायकोला सांगितलं. या नाटकातून मला शांतता मिळाली आणि सुटका मिळाली. यामुळे मला काय हवंय हे नेमकं समजलंय. तुकोबांनी गाथा बुडवली, त्या सुटकेमधील फिलॉसॉफी मला समजली. 


हे नाटक प्रेक्षकांपुढे आणण्याचं आम्ही फक्त एक माध्यम आहोत. येणाऱ्या शंभर वर्षामध्येही हे नाटक प्रेक्षकांच्या लक्षात ठेवतील अशी आशा आहे असं निर्माते प्रसाद कांबळी म्हणाले. 


मानसी जोशी म्हणते की, रखुमाईचं कॅरेक्टरशी मी वैयक्तिकरित्या रिलेट करते, स्वतःसाठी जग, जगताना स्वतःसाठी काहीतरी जपून ठेव असं रखुमाई आवलीला म्हणते. नेमकी हीच गोष्ट मला या नाटकाच्या माध्यमातून मिळाली. 


या नाटकात आवलीची भूमिका साकारणारी शुभांगी सदावर्ते म्हणते की, आवलीची भूमिका करताना मला मीच सापडली. मला स्थैर्य मिळालं. आवलीसारखी संसारात तग धरुन ठेवण्याची क्षमता माझ्यात आली. 


प्रत्येकाने आपापल्या वाट्याचं नांगरायचं असतं, पाऊस पडेल किंवा नाही याची चिंता करायची नसते असं एक वाक्य या नाटकात आहे. नाटक पाहिल्यानंतर नेमकी तीच भावना घेऊन प्रेक्षक निशब्द होऊन बाहेर पडतात.