Dada Gangurde At ABP Majha Katta : पोल्ट्री फॉर्म असो वा कोणताही व्यवसाय असो, लाज न बाळगता काम केलं तर यश हे नक्कीच मिळतं असा सल्ला एव्ही ब्रॉयलर्सचे दादा गांगुर्डे यांनी तरुणांना दिला आहे. 1993 साली सुरू झालेला हा प्रवास एव्ही ब्रॉयलर्सच्या रुपात आता भारतातील मोठ्या उद्योगाच्या यादीत समाविष्ट आहे. हा व्यवसाय आता रशिया आणि नॉर्वेमध्ये वाढवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 2,500 पक्षांपासून सुरू केलेला व्यवसाय आता मोठा झाला असून दररोज 1 लाखाहून अधिक कोंबड्यांची विक्री होत असल्याचं दादा गांगुर्डे यांनी सांगितलं.  पोल्ट्री व्यवसायातील मोठं नाव असलेले दादा गांगुर्डे हे एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमामध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी संवाद साधला. 


जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसं देता येईल हे माझं स्वप्न असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या पोल्ट्री व्यवसायामध्ये आपला वाटा वाढवायचा आहे असंही ते म्हणाले. 


एव्ही ब्रॉयलर्स कसं नाव ठेवलं?


कंपनीला एव्ही ब्रॉयलर्स असं नाव कसं पडलं या प्रश्नाला उत्तर देताना दादा गांगुर्डे म्हणाले की, वडिलांचे मोठे भाऊ ब्रिटिश भारतात पायलट होते. त्यांचा अपघाती निधन झालं. त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या नावाने आकाशवीर गॅस एजन्सी सुरू केली. नंतर आकाशवीर पोल्ट्री फॉर्म सुरू केलं. दुसरी पोल्ट्री सुरू केल्यानंतर त्याचं नाव एव्ही ब्रॉयलर्स असं नाव ठेवलं. 


दादा गांगुर्डे यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी 545 कोटी रुपयांचा व्यवसाय केला, या वर्षी 850 कोटी रुपयांवर तो जाईल. सध्या आपल्याकडे 1200 लोक हे कायमस्वरुपी काम करतात. तर 1800 पेक्षा जास्त शेतकरी आमच्यासोबत जोडले गेले आहेत. 
एक कोटी 10 लाखाहून जास्त स्क्वेअर फूट जागेवर हा व्यवसाय केला जात आहे. 


शाळेमध्ये हुशार नव्हतो, पण चांगला खेळाडू होतो. कुस्ती खेळायला सुरुवात केली. शाळा आणि महाविद्यालयाकडून कबड्डी खेळलो असं दादा गांगुर्डे यांनी सांगितलं. वडील एमकॉम झालेले, आजी कष्टाळू होती. आमच्याकडे 14 म्हशी होत्या, तीने खूप काम केलं. कामावर लक्ष देण्याची सवय तिच्याकडून लागली असंही ते सांगतात. 


असा सुरू केला व्यवसाय 


दादा गांगुर्डे म्हणाले की, वडिलांना शेतीमध्ये अपयश आलं, म्हणून वडिलांचं स्वप्न होतं की मी शेतीत चांगलं काम करावं. त्यामुळे मी बीएससी आणि एमएससी अॅग्रीकल्चर केलं. सुरुवातीला तीन चार वर्ष मी शेती केली. द्राक्षे केली, कांदे केली पण त्यातून जास्त काही यश आलं नाही. गोठा बांधत होतो पण त्याचं रुपांतर नंतर पोल्ट्री फॉर्म सुरू केलं. त्यानंतर वडिलांनी पाच लाख रुपयांचे कर्ज दिलं आणि त्यानंतर काम सुरू केलं. सुरुवातीला वीट भट्टी आणि पोल्ट्री सुरू केली. पण नंतर वीट भट्टी बंद केली आणि पोल्ट्री कायम ठेवली. 


ज्या दिवसी व्यवसाय सुरू केला त्या दिवसानंतर मात्र मी त्याचा अभ्यास सुरू केला असं दादा गांगुर्डे म्हणाले. ते म्हणाले की, मार्केटचा अभ्यास केला, पैशाच्या हस्तांतरणाचा अभ्यास केला. त्यानंतर मी स्वतःच कोंबड्या विकण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यावेळी मी 25 टपऱ्या काढल्या. शेतकऱ्याचं जे काही शोषण होतंय ते फक्त पिकवण्यामुळे होतंय, तो ते विकत नाही त्यामुळे त्याच्यावर ही परिस्थिती येते. 


बर्ड फ्लूच्या संकटाला कसं तोंड दिलं?


येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरं जाणं गरजेचं असल्याचं दादा गांगुर्डे म्हणाले. 2014 साली आलेल्या बर्ड फ्लूच्या काळात अनेकांनी कोंबड्यांचा धंदा बंद केला पण आम्ही कायम राहिलो, दुसऱ्याच वर्षी व्यवसायामध्ये मोठा फायदा झाला, 8 कोटीवरुन तो 23 कोटींपर्यंत गेला असं ते म्हणाले. ज्यांच्याकडे खूप जास्त पैसे होते, ते या व्यवसायात टिकले नाहीत, ज्यांनी पक्षावर प्रेम केलं ते यामध्ये टिकून राहिल्यांच ते म्हणाले. 


देशात चिकन खाणाऱ्यांची संख्या वाढतच जाणार 


व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम केल्याने बँकेमध्ये चांगलं क्रेडिट असल्याचं दादा गांगुर्डे यांनी सांगितले. ते म्हणाले की, आपलं क्रेडिट बघून बँकांनी आपल्याला लागेल तितकी आर्थिक मदत दिली. या आधी आपल्या देशामध्ये प्रति व्यक्ती चिकन कन्झम्शन हे 625 ग्रँम इतकं होतं, त्यावेळी आम्ही या व्यवसायाचा अभ्यास केला. आता तो साडे पाच किलो ग्रॅम इतका झाला आहे. 2030 पर्यंत तो साडे आठ किलो प्रति व्यक्ती इतका होईल. त्यामुळे आपल्या देशात पोल्ट्री व्यवसायाला मोठा स्कोप आहे. मलेशियामध्ये एक व्यक्ती हा 50 किलो ग्रॅम चिकन खातो तर रशियामध्ये हे प्रमाण 36 किलो आहे. त्यामुळे भारतातही चिकन खाण्याच्या प्रमाणामध्ये मोठी वाढ होईल. 


युवकांना काय सल्ला देणार?


आठ ते दहा हजार कोंबड्यांपासून हा व्यवसाय सुरू करावा असा सल्ला दादा गांगुर्डे यांनी या क्षेत्रात येणाऱ्या युवकांना दिला. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे अशा काही ठराविक शहरात चिकनची विक्री ही सर्वाधिक होते, त्यामुळे या शहरांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. 


कुठलाही व्यवसाय करायचा असेल तर लाज सोडली पाहिजे, लोक किंवा स्वतःचे नातेवाईक काय बोलतात याकडे लक्ष देऊ नये, स्वतः काम करावं असं दादा गांगुर्डे सांगतात. 


प्रोडक्शन सेक्टरपेक्षा सर्व्हिस सेक्टरमध्ये मोठा फायदा असल्याचं ते सांगतात. केवळ प्रोडक्शन करुन फायदा होणार असं नाही, सर्व्हिस सेक्टरमध्ये जास्त पैसा आहे असं ते म्हणतात.