लातूर: पैशाच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी टोळीच लातूर पोलिसांच्या हाती लागली आहे. या टोळीत काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती पूनम शहाणेचाही समावेश आहे. या टोळीनं 11 वर्षाच्या मुलीला पळवून सांगली जिल्ह्यातल्या खेडेगावात 34 वर्षाच्या इसमाशी लग्न लावून दिलं होत.
एबीपी माझानं या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन शोध घेतला तेव्हा वर्षभरात एक नव्हे दोन नव्हे तीनशे महिला आणि मुली लातूर जिल्ह्यातून मिसिंग झाल्याचं उघड झालं आहे.
राज्यातल्या 14 जिल्ह्यात या टोळ्यांचं जबरदस्त जाळं पसरलं आहे.
सध्या लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात दहा जणांची टोळी अटकेत आहे. यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या पूनम शहाणे यांचाही समावेश आहे.
शहाणेबाई अलिकडेच या टोळीत सहभागी झाल्या होत्या. शहाणे आणि साथीदार वधू वर सूचक मंडळ चालवत होते.
एक जुलैला शहराच्या एका भागातून अकरा वर्षांची मुलीला गोड बोलवून टोळीनं हातोहात पळवलं. मुलीची वाट पाहून थकलेल्या आईने पोलिसांत तक्रार दिली. पण 25 दिवस मुलीचा पत्ता लागला नाही.
या मुलीला सांगली जिल्ह्यातील तासगावातल्या सावर्डे गावातल्या 34 वर्षीय उमेश जगन्नाथ मानेला विकण्यात आलं होतं. पंचवीसाव्या दिवशी संधी साधून मुलीनं कुटुंबाला फोन केल्यावर पोलिस हालले आणि ही टोळी ताब्यात आली.
एबीपी माझाच्या टीमनं या संपूर्ण प्रकरणाचा मूळापासून शोध घेण्याचं ठरवलं. एक टीम तासगावातल्या सावर्डेत पोहोचून घटनास्थळाची माहिती घेतली.
तर दुसऱ्या टीमनं या टोळीचा तपशील मिळवला. तीन ते चार लाखात मुलींचा सौदा करण्यात ही टीम पटाईत आहे. टोळीतल्या महिलेच्या डायरीत देशभरातल्या लोकांचे मोबाईल नंबर आढळून आले आहेत.
लातूर पोलिसांचाच अंदाज आहे की मुलींना, महिलांना फसवून वाम मार्गाला लावण्याऱ्या काही टोळ्या लातूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. सीमावर्ती भाग असल्याने गुन्हे करुन पळून जाण्यात टोळ्या यशस्वी होत आहेत. गेल्या वर्षभरातच लातूर जिल्ह्यात 300 महिला, मुलींच्या मिसिंग केस दाखल झाल्या आहेत.
लातूर, बिदर, अंबाजोगाई , तासगावात छापे टाकून पोलिसांनी एका टोळीला तर पकडलं आहे. परंतु राज्यातल्या 14 जिल्ह्यातून दरवर्षी हजारो मुली पळवून वाम मार्गाला लावणाऱ्या टोळ्या कार्यरत आहेत. त्यांचा बंदोबस्त गृहमंत्री कसा करणार...? एकट्या लातूरात गायब झालेल्या 300 महिला- मुली कुठे आहेत? असे अनेक प्रश्न बाकी आहेत.
सांगलीहून कुलदीप माने, निशांक भद्रेश्वरसह राहुल कुलकर्णी, एबीपी माझा लातूर.
EXCLUSIVE: लग्नासाठी मुली पळवणारी टोळी, 'माझा'चा ग्राऊंड रिपोर्ट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2017 01:48 PM (IST)
पैशाच्या मोबदल्यात जाळ्यात सापडतील अशा मुलींचा शोध घेऊन देशभरात लग्न लावून देणारी टोळीच लातूर पोलिसांच्या हाती लागली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -