गणेशमूर्तीसाठी मोफत रिक्षा, आरिफ पठाणचा सामाजिक एकतेचा संदेश
एबीपी माझा वेब टीम | 05 Sep 2016 01:23 PM (IST)
कोल्हापूर: लाडक्या बाप्पाचं आगमन मोठ्या उत्सहात होत असताना, कोल्हापुरातील आरिफ पठाण या मुस्लिम तरुणाने सामाजिक एकतेचा अनोखा संदेश दिला आहे. आरिफ पठाण यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी बाप्पा घेऊन घरी जाणाऱ्या भाविकांना, स्वत:च्या रिक्षातून मोफत सेवा दिली. आरिफ पठाण यांनी १६ रिक्षांचं नियोजन करुन, शहरात तसंच उपनगरातून गणेश बाप्पांना घरी घेवून जाण्यासाठी आलेल्या गणेश भक्तांना ही सेवा दिली. आरिफ हे शिवाजी पेठेतील निवृत्ती चौकात राहतात. गेल्या दहा वर्षांपासून रिक्षा व्यवसाय करतात. पाच वर्षांपूर्वी गंगावेश इथल्या कुंभार गल्लीत ते भाड्यासाठी थांबले होते. मात्र त्यावेळी रिक्षाचालक भाविकांकडून जादा भाडे आकारात होते. हे आरिफ यांना पटत नव्हतं. त्याचमुळे आरिफ यांनी सण-उत्सवाला मोफत रिक्षासेवा देण्याचा निर्णय घेतला. आरिफ यांचं मोफत रिक्षा सेवा देण्याचं यंदाचं पाचवं वर्ष आहे.