Aarey Metro Car Shed : आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे, पर्यावरणवाद्यांनी या कामाला विरोध केला आहे. सर्वोच्च न्यायालयात धाव घेत हे काम थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे, येत्या काही वर्षात आरेची ही जागा अपुरी पडणारअसल्याचा देखील दावा करण्यात आला आहे



शिंदे सरकारकडून आरेतील मेट्रो कारशेडच्या कामाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर कारशेडच्या कामास सुरुवात झालीय. यासाठी परिसरात संपूर्ण बॅरिकेटिंग लावण्यात आली असून सुरक्षा रक्षक देखील तैनात करण्यात आले आहे. सोबतच जेसीबीचा वापर करत छोटे वृक्ष बाजूला सारत जमिनीचे सपाटीकरण देखील केले जात आहे. 


 मात्र, शिंदे सरकारकडून कामाला हिरवा कंदील दिल्यानंतर पर्यावरणवाद्यांनी या कामास विरोध केला आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जात हे काम थांबवण्यासाठी याचिका केलीय. याप्रकरणी शुक्रवारी न्या. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. 


दरम्यान, याप्रकरणी आरेतील जागा अपुरी पडणार असल्याचा दावा देखील पर्यावरणवादी करतायत. यात मुख्य सचिवांनी दिलेल्या अहवालातही ही बाब स्पष्ट करण्यात आल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून करण्यात आला आहे


कारशेडसाठी जागा अपुरी पडणार?



  • आरेत 25-30 हेक्टर जागा कारशेडकरता वापरण्यात येणार 

  • ज्यात 240 डब्बे उभे राहू शकतील

  • मात्र 2031 पर्यंत  डब्यांची संख्या 440  होणार असून सध्याची जागा अपुरी पडेल असल्याचा दावा आहे 

  • राज्य सरकारकडून प्रत्यक्षात आरेतील  61 हेक्टर जागा  संपादित केली आहे 

  • येत्या काही वर्षात उर्वरीत ठिकाणांवरील झाडं कापली जाण्याची भीती आरे संवर्धन गटाकडून व्यक्त 


2025 पर्यंत मेट्रो-3 करता 47 गाड्यांची गरज आहे, तर 2031 पर्यंत 55 गाड्यांची गरज आहे. मुंबईतील अनेक प्रकल्प अपूर्ण स्थितीत आहेत. मुंबईकरांना प्रवासादरम्यान अनेक अडचणी येत आहेत. दुसरीकडे, मुंबईकरांसाठी महत्त्वाची असलेली आरेसारखी निसर्ग संपदा आहे. अशा द्विधा मनस्थिती हा प्रकल्प सापडलाय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात या प्रकल्पाचं काय होतं हे बघणं आता महत्त्वाचे असणार आहे.