मुंबई : राज्य सरकारने गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा (Transfer) सपाटाच लावला आहे. दर 8 ते 15 दिवसांनी 'अ' वर्ग दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वृत्त झळकत आहे. राज्य सरकारकडून 15 दिवसांपूर्वीच काही जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांच्या बदल्या करण्यात आला होत्या. आता, पुन्हा एकदा आयएएस 6 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये, नागपूरच्या (Nagpur)अतिरिक्त आयुक्तांना मुंबईत बढती देण्यात आली असून आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, कालच नागपूरमध्ये दोन गटांत तणाव निर्माण झाल्यामुळे नागपूर शहर राज्यात चर्चेत होते. दरम्यान, सध्या नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यातच, आता नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तांची बदली करण्यात आली आहे.
नागपूरसह जळगाव, नांदेड, पालघर आणि गडचिरोलीतील अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांची छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर बदली करण्यात आली आहे. त्यामुळे, शासनाने नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथील काही अधिकारी बदलल्याचं दिसून येत आहे. तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री असलेल्या गडचिरोलीतही आयएएस रजणीत यादव यांना वेगळा पदभार देण्यात आला आहे.
अधिकारी व त्यांच्या बदलीचे ठिकाण
आंचल गोयल (आयएएस:आरआर:2014) अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, नागपूर यांची मुंबई शहर, मुंबई येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
अंकित (आयएएस:आरआर:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांची छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मीनल करनवाल (आयएएस:आरआर:2019) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नांदेड यांची जिल्हा परिषद, जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कवली मेघना (आयएएस:आरआर:2019) प्रकल्प संचालक, आयटीडीपी, किनवट आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, किनवट उपविभाग, नांदेड यांची जिल्हा परिषद, नांदेड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
करिश्मा नायर (IAS:RR:2021) प्रकल्प संचालक, ITDP, जव्हार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग, पालघर यांची नाशिक महानगरपालिका, नाशिक येथे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
रणजित मोहन यादव (IAS:RR:2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, कुरखेडा उपविभाग, गडचिरोली यांना प्रकल्प अधिकारी, ITDP, गडचिरोली येथे आणि सहाय्यक जिल्हाधिकारी, गडचिरोली येथे नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय