अकोला : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातल्या दगडपारवा येथे धरणात बुडून तिघी मायलेकींचा मृत्यू झाला. या तिघींचे मृतदेह आज (2 मे) सकाळी धरणात आढळून आले. आई पाय घसरुन पडल्याने तिला वाचवायला गेलेल्या दोन मुलीही बुडून मरण पावल्या. मृतांमध्ये आई सरिता घोगरे आणि अंजली, वैष्णवी या दोन मुलींचा समावेश आहे. हरवलेली म्हैस शोधायला गेल्या असताना ही घटना घडली आहे. 

बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा (Ragad-Parava Dam) येथील धरणातून सांडवा पाणी वाहत आहे. दगडपारवा गावातील घोगरे कुटुंबातल्या दोन मुली आणि त्यांची आई हे आपल्या म्हशीच्या शोध घेण्यासाठी काल (1 मे) दुपारी तीन वाजता घरातून निघाल्या होत्या. मात्र रात्री उशीर झाला, अन् त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबातील प्रमुख असलेले सुरेश घोगरे यांनी त्यांचा शोध घेतला, मात्र, त्या कुठेच आढळून आल्या नाहीत. अखेर त्यांनी यासंदर्भात बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात तिघीजणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. परंतु, आज सोमवारी सकाळी आठच्या सुमारास गावकऱ्यांना धरणाच्या सांडवाच्या पाण्यात या तिघींचे मृतदेह आढळून आले. लागलीच यासंदर्भात पोलिसांना माहिती देतात त्यांनी घटनास्थळ गाठले. अन् बचाव पथकासह गावकऱ्यांच्या मदतीने तिघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. सद्यस्थितीत मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय रुग्णालयात रवाना केले आहेत. 

अन् क्षणार्धात उद्ध्वस्त झालं हसतं-खेळतं कुटुंबसरिता सुरेश घोगरे (वय 40 वर्षे)असं मृत महिलेचं (आई) नाव आहे. तर मोठ्या मुलीचं नाव अंजली सुरेश घोगरे (वय 16 वर्षे) आणि दुसऱ्या लहान मुलीचं नाव वैशाली सुरेश घोगरे (वय 14 वर्षे) नाव आहे. या तिघीही काल धरणाच्या परिसरात म्हशीचा शोध घेत असताना सरिता पाय घसरुन धरणात पडल्या. आईला वाचवण्यासाठी दोन्ही मुलींनीही पाण्यात उड्या मारल्या. मात्र, तिघीनांही पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. क्षणार्धात सुरेश घोगरे यांचं अख्ख कुटुंब काळाने त्यांच्यापासून हिरावून नेलं. 

दगडपारवा गाव दुःखात बुडालंआईसह दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण दगडपारवा गावासह घोगरे कुटुंब आता दुःखात बुडालं आहे. आज त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. दरम्यान, या तिघींचा खरंच मृत्यू की घातपात?, हा तपास सध्या बार्शीटाकळी पोलीस करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ते पुढील तपास करत आहेत.