बीडमधून बेपत्ता असलेल्या प्रेमीयुगुलाची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 04 Jul 2017 10:00 PM (IST)
बीड : बीडमधून बेपत्ता झालेल्या प्रेमी युगलाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. बारा दिवसांपासून गायब असलेल्या या प्रेमी युगुलाने आज सकाळी विष प्राशन करुन आत्महत्या केली. बीड तालुक्यातील केसापुरी परभणी येथील नारायण खवचत आणि खांडे पारगाव येथील तरुणीचे प्रेम संबंध होते. दोघेही गेल्या दहा ते बारा दिवसांपासून बेपत्ता होते. या प्रेमी युगुलाने आज सकाळी केसापुरी परभणीच्या शिवारात विषप्राशन केलं. हा प्रकार गावातील लोकांच्या लक्षात येताच दोघांनाही उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच दोघांचाही मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेनंतर त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मात्र नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आणि पोलिसांनाच अंत्यसंस्कार करा, असंही सांगितलं.