बुलढाणा : आयपीएस अधिकारी अनिल पारस्कर यांच्याविरोधात जमीन बळकावण्याची तक्रार बुलढाण्यातील एका आदिवासी शेतकऱ्याने केली आहे. अनिल पारस्कर यांनी पदाचा बेकायदेशीर वापर करुन पत्नीच्या नावे असलेली शेती बळजबरीने हडपल्याची दावा वरवट बकाल इथल्या शेतकऱ्याने केला आहे. या तक्रारीत अनिल पारस्कर, त्यांचे वडील, भाऊ यांच्यासह सहा जणांची नावं आहेत. त्यांनी या तक्रारीच्या प्रति मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनांना पाठवल्या आहेत. तसंच अनिल पारस्कर आणि त्यांच्या कुटुंबियांपासून संरक्षण मिळावं अशी मागणीही या शेतकऱ्याने केली आहे.
दुसरीकडे या तक्रारीबद्दल अनिल पारस्कार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही तक्रार निराधार असल्याचं सांगितलं आणि याबद्दल अधिक बोलण्यास नकार दिला.
आयपीएस आणि रायगडचे माजी पोलीस अधीक्षक अनिल सुभाष पारस्कर हे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी बहुल संग्रामपूर तालुक्यातील सावळा या गावचे आहेत. त्यांच्या वडिलोपार्जित शेतीचा बऱ्याच दिवसांपासून वाद सुरु आहे.
"अनिल पारस्कर हे मोठे पोलीस अधिकारी असून ते त्यांच्या पदाचा अतिशय चुकीच्या आणि बेकायदेशीररित्या वापर करत आहेत. अनिल पारस्कर यांनी काही हस्तकांच्या मार्फत मला आणि माझ्या पत्नीला धमक्या दिल्या आणि बळजबरीने माझ्या पत्नीच्या नावे असलेली शेती परस्पर बळकावली," असा आरोप तक्रारदार शेतकरी मोहन डाबेराव यांनी केला आहे. "अनिल पारस्कर मध्यस्थांमार्फत दबाव आणून आपल्या हिताचा निर्णय करुन घेतात. तसंच पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरुन माझ्यावर तडीपारीचा प्रस्ताव दाखल करुन घेतला आहे," असाही गंभीर आरोप या शेतकऱ्याने पारस्कर यांच्यावर केला आहेत.
अनिल पारस्कर आणि त्यांच्या कुटुंबियांकडून धमक्या मिळत असून संरक्षणा द्यावी अशी मागणी मोहन डाबेराव यांनी केला आहे. दरम्यान अनिल पारस्कर यांचा सरळ या वादाशी काही संबंध नसला तरी इथले आदिवासी मोहन डाबेराव या शेतकऱ्याने केलेले आरोप गंभीर आहे.