सोलापूर : राज्य सरकारने यावर्षीपासून नववीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र शाळा सुरु होऊन देखील बाजारात पुस्तकेच उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाऊन नुसते बसावे लागत आहे. तर विद्यार्थ्यांना काय शिकवायचं, हा प्रश्नही शिक्षकांसमोर आहे.


CBSC आणि ICSC शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत राज्याचा अभ्याक्रम सोपा असल्याने NEET आणि IIT सारख्या परीक्षेत राज्यातील विद्यार्थी मागे राहतात. त्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील अभ्यासक्रमही CBSC च्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार यावर्षी नववीचा अभ्यासक्रम बदलला. मात्र शाळा सुरु होऊन 2 दिवस झाले तरी सेमी इंग्रजी माध्यमाचे एकही पुस्तक बाजारात उपलब्ध झालेलं नाही. त्यामुळे पाठ्यपुस्तक मंडळाचा सावळा गोंधळ पुन्हा समोर आला आहे.

नववी हा दहावीचा पाया असल्याने या वर्षाकडे सर्वच विद्यार्थी गांभीर्याने पाहत असतात. अजून बाजारात पुस्तकेच उपलब्ध नाहीत. शिवाय नवीन अभ्यासक्रम आल्यावर त्याच्या शिक्षक प्रशिक्षणात काही काळ जाणार आहे. त्यामुळे प्रशिक्षणाला जास्त कालावधी गेला, तर अभ्यासक्रम कधी पूर्ण होणार आणि पुस्तके कधी येणार, हा प्रश्न पालकांना पडला आहे.

मराठी माध्यमातील काही पुस्तके सध्या बाजारात उपलब्ध आहेत. मात्र इंग्रजी माध्यमांचे एकही पुस्तक नसल्याने बाजारात विद्यार्थीही दुकानांसमोर रोज पुस्तकांची चौकशी करून जात आहेत. पण पुस्तके कधी येणार, याबाबत आम्हालाही कल्पना नसल्याचं दुकानदारांचं म्हणणं आहे.