बुलढाणा : बुलढाण्यात 15 ते 20 मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात नऊ वर्षांच्या मुलाचा मृत्यू तर आई गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बुलढाणा तालुक्यातील सैलानीमध्ये काल (21 ऑक्टोबर) संध्याकाळी पाचच्या सुमारास उंबरखेड शिवारात ही घटना घडली. जखमी आईवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
लातूर जिल्ह्यातील धर्मापूर येथील शेख तस्लीम मागील काही काळापासून सैलानी येथे आपल्या परिवारसह राहत आहेत. सध्या ते रमेश शेवाळे यांच्या शेतात राहतात. काल सायंकाळी पाचच्या सुमारास नऊ वर्षीय शेख अरमान किराणा सामान आणण्यासाठी सैलानीकडे जात होता. परंतु 15 ते 20 मोकाट कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवत त्याचे लचके तोडले. आरडाओरड ऐकून त्याची आई नसीम बी त्याला वाचण्यासाठी धावत गेली. परंतु कुत्र्यांनी तिच्यावरही हल्ला केला. यात ती देखील गंभीर जखमी झाली. त्यांच्या मदतीला काही लोक धावत आले तेव्हा कुत्रे पळून गेले.
गावाकऱ्यांनी दोघांनाही तात्काळ बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेलं. परंतु डॉक्टरांनी शेख अरमानला मृत घोषित केले तर आई नसीम बी गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. आता परिसरातील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत.